राज्याचे माजी मंत्री आणि सिल्लोड चे विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा नफिसा बेगम (वय ६०) यांचे दुःखद निधन झाले. त्या विद्यमान नगराध्यक्ष अब्दुल समीर व जिल्हा परिषद सदस्य अब्दुल आमेर यांच्या आई होत.अनेक वर्षांपासून सिल्लोडच्या राजकारणात आणि समाजकारणात सक्रिय असलेल्या व तब्बल पाच वेळा नगराध्यक्ष पद भूषविलेल्या नफिसा बेगम गेल्या काही दिवसापासून आजारी होत्या.त्यांच्या निधनाने सत्तार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सिल्लोड शहरात शोककळा पसरली आहे.
पहिल्या महिला नगराध्यक्ष राहिलेल्या नफिसा बेगम यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी १० वाजता सिल्लोड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी, त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या सिल्लोड येथील निवासस्थानी ठेवण्यात आले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला असून, अंत्यसंस्कारासाठी राज्यातील अनेक मोठे नेते सिल्लोडमध्ये उपस्थित होते.
अब्दुल सत्तार हे सध्याच्या राजकीय समीकरणात महत्त्वपूर्ण नेते मानले जातात. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपद भूषवले होते, या राजकीय चढउताराच्या काळात कुटुंबाचा भक्कम आधार असलेल्या नफिसा बेगम यांच्या जाण्याने सत्तार कुटुंबात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
१६ वर्षे भूषविले सिल्लोड नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद:
नफिसा बेगम यांनी केवळ एका बड्या राजकीय नेत्याची पत्नी म्हणून काम न करता सिल्लोड नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद भूषवताना त्यांनी शहराच्या विकासात महत्वाची भूमिका बजावली.सप्टेंबर २००१ ते सप्टेंबर २०१६ असे तब्बल १६ वर्षे त्या सिल्लोड च्या नगराध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या पश्चात पती आमदार अब्दुल सत्तार नगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा परिषद सदस्य अब्दुल आमेर ही दोन मुले, पाच मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. नफिसा बेगम यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांनी फोन द्वारे अब्दुल सत्तार यांचे सांत्वन केले.
अंत्यसंस्कार प्रसंगी खासदार डॉ.कल्याणराव काळे, आमदार अर्जुनराव खोतकर,माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,माजी आमदार चंद्रकांत दानवे,नितीन पाटील, वैजापूर चे नगराध्यक्ष दिनेशसिंग परदेशी,बाळासाहेब संचेती यांच्यासह सिल्लोड तालुक्यातील तसेच छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.