---Advertisement---
जळगावच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडत असून उन्मेष पाटील हे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार असलेले उन्मेष पाटील हे आता शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. 6 मार्च रोजी मुंबईत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत ते शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात अधिकृत प्रवेश करणार आहेत.
प्रवेशापूर्वी उन्मेष पाटील यांनी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जिल्ह्यातील शिंदे गटाचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे जळगावमध्ये ठाकरे गटासाठी हा मोठा राजकीय धक्का समजला जात आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी चाळीसगाव मतदारसंघातून निवडणूक लढवली; मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. ठाकरे गटात असताना त्यांनी भाजप नेते गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
आता ते महायुतीतील शिंदे गटात प्रवेश करत असल्याने भाजपकडून त्यांना विरोध होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. 6 मार्च रोजी होणारा हा प्रवेश सोहळा जळगावच्या राजकारणात नव्या समीकरणांना जन्म देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









