जळगाव : शेअर ट्रेडिंग ॲपच्या माध्यमातून मोठा नफा मिळवण्याचे आमिष दाखवून जळगाव येथील दोघां बहिणांना तब्बल सहा लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार रविवारी समोर आला आहे. या प्रकरणात संशयितांनी समाज माध्यमाच्या आधारे कॉल करून त्यांच्या संपर्कात येत विश्वास संपादन केला आणि हा डल्ला मारला आहे. याबाबतची फिर्याद सायबर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
व्हॉट्ॲपव्दारे संपर्क साधत सायबर ठगांनी दोन महिलांना शेअर मार्केटमधून नफ्याचे अमिष दाखविले. सुरुवातीला एक लाखाचा परतावा केला. त्यानंतर दोन बहिणींकडून तब्बल ६ लाखाहून अधिक रक्कम घेत सायबर ठगांनी ऑनलाईन फसवणूक केली. फसवणुकीचा प्रकार शहरात २१ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर दरम्यान घडला. या प्रकरणी रविवार, ६ रोजी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
३६ वर्षीय गृहिणी दादावाडी परिसरात वास्तव्यास आहे. या महिलेसह तिच्या बहिणीच्या व्हॉट्ॲपव्दारे आयुषी तसेच सुभाष अग्रवाल यांनी वारंवार संपर्क साधला.एसएमसी गोबल सिक्युरिटी २७ मध्ये त्यांना अॅड केले. त्यानंतर या भगिनींना लिंक पाठविली. एसएमसी सिकुयरिटी या शेअर ट्रेडिंग ॲपच्या माध्यमातून मोठा नफा मिळवण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर या महिलांना हे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. यावेळी महिलांना या ठगांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीतून अधिक नफा कमविण्याचा फंडा सांगितला. यानुसार महिलांनी काही रक्कम गुंतविली. त्यानंतर ठगांनी महिलेस ३० हजार तर त्याच्या भगिनीला ७५ हजार रुपयांचा नफा मिळाल्याचे भासवले. महिलांचा विश्वास संपादन करत गुंतवणुकीची रक्कमही मोठ्या प्रमाणात वाढतच गेली.
यातून ठगांची खेळी यशस्वी झाली.
त्यानंतर या महिलेकडून वेळोवेळी ३ लाख ६५ हजार रुपये तर त्यांच्या भगिनीकडून वेळोवेळी २ लाख ४० हजार रुपयये असे एकुण ६ लाख ५ हजार रुपये ऑनलाईन नेटबँकिंगव्दारे वेगवेगळ्या बँक खात्यात ठगांनी स्विकारले.
ही रक्कम व नफा याबद्दल महिलांनी सबंधिताशी संपर्क साधला असता ठगांकडून प्रतिसाद मिळाला नाही. आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आल्याने भगिनींनी सायबर पोलीस ठाण्यात जाऊन प्रकार कथन केला. या प्रकरणी दोन सायबर ठगांविरोधात गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड हे करीत आहेत.