जळगाव : पाचोरा तालुक्यातील भीषण रेल्वे अपघातात मयत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना आणि अहोरात्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खान्देश केटरिंग असोसिएशनने मोफत भोजन व पाणी पुरवठा केला. या कार्याची दखल घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी असोसिएशनच्या कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान केले.
पाचोरा तालुक्यातील वडगाव परिसरात झालेल्या रेल्वे दुर्घटनेत १२ जण मयत झाले होते. अपघाताच्या गंभीर परिस्थितीत, प्रशासनाचे काम चालू असतानाही खान्देश केटरिंग असोसिएशनने रुग्णालयात जखमी व्यक्तींना तसेच मृतांच्या नातेवाईक यांच्यासह शासकीय कार्यवाही करणारे अधिकारी , कर्मचारी यांना मोफत जेवण व पाणी पुरवण्याची तातडीची व्यवस्था केली.
त्यांच्या या कार्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रचंड कौतुक केले. या सन्मान सोहळ्यात असोसिएशनचे सचिव रतन सारस्वत यांनी हा सन्मान स्वीकारला. मोफत भोजन व्यवस्थेसाठी असोसिएशनचे अध्यक्ष सत्यनारायण जोशी, सचिव रतन सारस्वत, सहसचिव दिनेश टाटीया, रामचंद्र महाराज, शिवा तिवारी, सुनील बियाणी, महावीर कुमावत, मोहन महाराज यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी यासाठी परिश्रम घेतले.