धरणगाव : येथील ‘दुर्गेश इम्पेक्स’ या जिनिंग मीलच्या शेतकऱ्यांचे कापसाचे पेमेंट करण्यासाठी जळगावातील बँकेतून १ कोटी ६० लाख रुपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या वाहनावर १७ फेब्रुवारी २०२४ रोजी मुसळी फाट्यावर धडक देऊन रोकड लुटली होती. हि लूट करताना वाहनातील अकाऊंटंट दीपक महाजन, कर्मचारी योगेश पाटील आणि चालक उमेश पाटील यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लुटल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मुख्य सूत्रधार फरार होता त्यास एलसीबीच्या पथकाने सुरत येथून शिताफीने ताब्यात घेतले. दरम्यान, या लूट प्रकरणात चौघा संशयितांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनविण्यात आली आहे.
‘दुर्गेश इम्पेक्स’ या जिनिंग मीलचे पैसे घेतल्याप्रकरणात चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते, पण मुख्य आरोपी टिल्लूसिंग राजूसिंग टाक (शिकलकर) हा दहा महिन्यांपासून फरार होता. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना शिकलकर टोळीतील प्रमुख सुरत येथील परसबाग परिसरात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, एलसीबीच्या पथकाने सुरत येथून शिकलकरला पायी चालत असताना शिताफीने ताब्यात घेतले. त्याने पोलिसांकडे गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास उप पोलीस निरीक्षक गणेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.