धुळे : जिल्ह्यातील साक्री तालुक्यात सुझलॉन कंपनीच्या टॉवरच्या कॉपर केबल चोरणाऱ्या टोळीला निजामपुर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १२ लाख ९२ हजार ९०० रुपये जप्त करण्यात आले. तसेच दुसऱ्या गुन्ह्यात एक अल्पवयीन मुलासह दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लहू आसाराम बोरसे (रा. जैताणे ता. साक्री) यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी निलेश खंडु गायकवाड (२७, सटाणा) आणि आमिन करीम खान (३५, जैताणे) यांना अटक केली. त्यांच्या कडून सुमारे १२ लाख ९२ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, ज्यामध्ये चोरीला गेलेली कॉपर केबल, इतर साहित्य, मोबाईल आणि मालवाहतुक पिकअप वाहन यांचा समावेश आहे.
तसेच, दुसऱ्या गुन्ह्यात भरत प्रताप पवार यांच्या फिर्यादीवरून अजय थावरु राठोड, पंकज विठोबा देसले आणि एक अल्पवयीन यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे ४० हजार ३५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये एकूण १३ लाख ३३ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी एस.आर. बांबळे आणि पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनच्या पथकाने केली.