कासोदा, ता. एरंडोल : गळतीमुळे गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन त्यात नऊ जण जखमी झाले असून, जखमींना स्थानिक तसेच जळगाव येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. दरम्यान, स्फोटामुळे लागलेल्या आगीत संपूर्ण घरातील। संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे.
गॅस सिलिंडर गळतीमुळे पेंटर काम करणाऱ्याच्या घराला आग लागून अंदाजे लाखो रुपयांपर्यंत नुकसान झाल्याचे समजते. घरातील परिवार अंगणात सार्वजनिक दुर्गा देवीची आरती करण्यासाठी बाहेर असल्याने जीवित हानी टळली. ही घटना ६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ ते ७:३० दरम्यान येथील खैरनार गल्लीतील अनिल पुना मराठे यांच्या घरी घडली.
संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास गॅस सिलेंडरची हंडी संपल्याने नवीन हंडी आणली होती. ती बसवल्यानंतर त्यातून गॅस लिकेज होऊ लागला व गॅसचा भडका झाला. यामुळे अनिल मराठे व त्यांच्या कुटुंबीयांनी घराबाहेर धाव घेतली.
दरम्यान, शेजारील ग्रामस्थांना घटना समजल्यावर त्यांना वाटले की, शेतकऱ्याच्या कपाशीला आग लागली आहे. त्यामुळे ते घराच्या दरवाजा जवळ गेले असता अचानक घरातील गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला.
या घटनेत रस्त्याच्या पलीकडील २५ ते ३० फुट अंतरावर असलेल्या किराणा दुकानावर उभे असलेले ज्ञानेश्वर देवराम पाटील (वय ४५), माधवराव शामराव गायकवाड (वय ३३), शुभम सुरेश खैरनार (वय २५), सुरेश अर्जुन खैरनार (वय ५०), सागर कृष्णा सूर्यवंशी, आबा सुकलाल चव्हाण, नगराज देवराम पाटील, घरमालक अनिल पुना मराठे, सागर किसन मराठे, भाऊसाहेब गायकवाड, दीपक रमेश खैरनार, जखमी झाले. यांच्यावर कासोदा येथील खाजगी रुग्णालयात प्रथम उपचार करून यापैकी काही जणांना पुढील उपचारासाठी जळगाव खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान कासोदा पोलीस स्टेशनचे एपीआय राजपूत यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले होते.
घरातील संसारोपयोगी संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. या घटनेबाबत कासोदा पोलीसांत अद्याप नोंद करण्यात आलेली नाही. आग विझवण्यासाठी एरंडोल येथील अग्नीशमन दलाचे बंब मागवण्यात आले होते.