जळगाव : गिरणा पंपिंग येथील जुनी पाइपलाइन तसेच जलशुद्धीकरणातील साहित्य व भंगार चोरी प्रकरणी गुरुवार, १२ रोजी संध्याकाळी न्यायालयीन कोठडीतील संशयित अक्षय अग्रवाल तसेच भावेश पाटील यांना तालुका पोलिसांनी कारागृहातून न्यायालयाच्या परवानगीने ताब्यात घेतले.
मनपा मालमत्तेची चोरी करून परस्पर विल्हेवाट लावत्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दोन, तर रामानंदनगर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. रामानंदनगरच्या गुन्ह्यात अक्षय अग्रवाल आणि भावेश पाटील यांची न्यायालयीन कोठडी अंतर्गत कारागृहात रवानगी करण्यात आली होती. गुन्ह्याच्या तपासकामी या दोघांचा ताबा मिळावा, यासाठी तपासाधिकाऱ्यांनी गुरुवारी न्यायालयात पत्र दिले होते. न्यायालयाने या पत्राला मंजुरी दिली. संध्याकाळी हे पत्र घेऊन पोलीस निरीक्षक महेश शर्मा हे कारागृहात रवाना झाले. या पत्राचा स्वीकार केल्यानंतर कारागृह प्रशासनाने दोघा संशयितांना तालुका पोलिसांच्या स्वाधीन केले. या दोघांना पोलीस कोठडी मिळावी, यासाठी आज शुक्रवार, १३ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात येईल.
फेब्रुवारीमध्ये गिरणा पंपिंग, सावखेडा येथील जलशुद्धीकरण केंद्र, दापोरा पंपिंग व उमाळा जलशुध्दीकरण केंद्र येथील स्क्रॅप झालेल्या साहित्याचे टेंडर मनपामार्फत ई निविदा प्रक्रियेद्वारे कॉण्ट्रक्टर अभय शिंदे यांना दिले होते. शिंदे यांची चंदामृत एण्टरप्रायझेस नावाची फर्म आहे. त्याद्वारे ते स्क्रॅप, रद्दी विक्रीचा व्यवसाय करतात.
या व्यवसायात शिंदे यांना त्यांचा मित्र अक्षय अग्रवाल हा मदत करत होता. स्वतःच्या फायद्यासाठी मनपा मालमत्तेची विल्हेवाट लावण्याचा कट सूत्रधार सुनील महाजन यांनी रचला. या कटात अक्षय अग्रवाल, भावेश पाटील, अमिन राठोड, कुंदन पाटील, निरंजन व सादिक खाटीक हे सामील झाले. भंगार व्यावसायिकाला विक्री करून पैसे घेतले.
गुन्ह्याला कसे स्वरूप दिले? कोणाच्या गाईड लाइनने मालमत्ता खोदून चोरी केली? जेसीबी तसेच भंगार वाहतुकीसाठी कोणत्या वाहनांचा वापर केला? या कामासाठी कोणी कोणी मदत केली? त्या बदल्यात काय लाभ देण्याचे ठरले? अशी माहिती जाणून घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न राहणार आहे.