मराठी साहित्याचा गौरव; राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार

---Advertisement---

 

नवी दिल्ली : साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या साहित्य अकादमी पुरस्कारांचे २०२५ वर्षासाठी वितरण समारंभ दिल्ली येथे मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी मराठी भाषेसाठी जळगाव येथील प्रख्यात चित्रकार व लेखक राजू बाविस्कर यांना त्यांच्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मकथेसाठी प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला.


कमानी ऑडिटोरियम येथे आयोजित या समारंभात साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते बाविस्कर यांना मानचिन्ह, शाल आणि एक लाख रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी साहित्य अकादमीचे माजी अध्यक्ष विश्वनाथप्रसाद तिवारी, उपाध्यक्षा कुमुद शर्मा, संस्कृती मंत्रालयाचे अधिकारी अनीश राजन तसेच सचिव पल्लवी होळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
समारंभात बोलताना विश्वनाथप्रसाद तिवारी यांनी साहित्यिकांचा सन्मान करणे हे समाजाचे कर्तव्य असल्याचे अधोरेखित केले.

साहित्याच्या माध्यमातून समाजात सकारात्मक मूल्यांची जपणूक होत असल्याने अशा सर्जनशील कार्याचा गौरव होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच इतिहासात साहित्यिकांनी समाज परिवर्तनात महत्त्वाची भूमिका बजावली असून स्वभाषा आणि स्वदेशी विचारांना बळ मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले.


अध्यक्ष माधव कौशिक यांनी पुरस्कार निवडीमागील प्रक्रियेचे स्पष्टीकरण दिले, तर सचिव पल्लवी होळकर यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्षा कुमुद शर्मा यांनी आभार प्रदर्शन केले.


यंदा देशातील २४ मान्यताप्राप्त भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतींची निवड तज्ज्ञ समितीद्वारे करण्यात आली असून काव्य, कादंबरी, कथासंग्रह, निबंध, समीक्षा आणि आत्मकथा अशा विविध साहित्यप्रकारांचा समावेश आहे. विविध भाषांमधील साहित्यिक परंपरेचा गौरव करणाऱ्या या पुरस्कारांमुळे भारतीय साहित्याची समृद्ध परंपरा अधोरेखित झाली आहे.


इतर भाषांतील पुरस्कार विजेत्यांमध्ये आसामी, बांगला, हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू, उर्दू आदी भाषांतील नामवंत साहित्यिकांचा समावेश असून देशभरातून त्यांच्या साहित्यकृतींना मान्यता मिळाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---