---Advertisement---
जळगाव : सराफा बाजारात आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. मागील आठवड्यात किंचित वाढ झाल्यानंतर आज दोन्ही धातूंच्या दरात लक्षणीय घट झाल्याने बाजारात चर्चेला उधाण आले आहे.
आजच्या घसरणीत सोन्याच्या दरात तब्बल 1 हजार 700 रुपयांची घट झाली असून चांदीच्या दरात 3 हजार रुपयांनी घसरण नोंदवली गेली आहे. जळगाव सराफा बाजारात सध्या सोन्याचा दर 1 लाख 59 हजार 500 रुपये प्रति तोळा इतका असून जीएसटीसह हा दर 1 लाख 64 हजार 285 रुपये इतका आहे. तर चांदीचा दर 2 लाख 66 हजार रुपये प्रति किलो इतका नोंदवला गेला असून जीएसटीसह चांदीचा दर 2 लाख 73 हजार 980 रुपये इतका झाला आहे.
दरम्यान, जागतिक पातळीवर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आर्थिक बाजारावरही होत असल्याचे दिसत आहे. अमेरिकेच्या रिझर्व बँकेने व्याजदर वाढवण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यानंतर मजबूत झालेला डॉलर यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरावर दबाव निर्माण झाला आहे. याचाच परिणाम स्थानिक सराफा बाजारावरही दिसून येत असल्याचे सराफा व्यावसायिकांचे म्हणणे आहे.









