“तुझा बाबा सिद्दिकी करू; गुगलवर सर्च कर… बिश्नोई गँग कोण आहे ते कळेल…” गोल्डन मॅन’ सनी वाघचौरेला खंडणीसाठी थेट जीवे मारण्याची धमकी….!

---Advertisement---

 

पुण्याच्या पिंपरी-चिंचवड शहरातून एक गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘गोल्डन मॅन’ म्हणून ओळख असलेले सनी नाना वाघचौरे यांना खंडणीसाठी धमकी मिळाल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सनी वाघचौरे यांच्या मोबाइलवर आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून वारंवार व्हॉट्सॲप कॉल आणि मेसेज आले. कॉल उचलल्यानंतर समोरच्या व्यक्तीने स्वतःची ओळख एका कुख्यात टोळीशी संबंधित असल्याचे सांगत, आर्थिक मागणी केल्याचा आरोप आहे. रक्कम न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या कॉल्सकडे सुरुवातीला दुर्लक्ष करण्यात आले. मात्र त्यानंतर थेट धमकीचे मेसेज आल्यानंतर सनी वाघचौरे यांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला. आपल्याला जीवाचा धोका असल्याची भीती व्यक्त करत त्यांनी तात्काळ पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात लेखी तक्रार दाखल केली आहे.

नेमकं घडलं काय ?

दि. २५ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास एका आंतरराष्ट्रीय मोबाईल नंबरवरून सनी वाघचौरे यांच्या मोबाइलवर व्हॉट्सॲप कॉल आला. तो कॉल न उचलल्याने काही वेळातच “शुभम लोणकर कॉल मी” असा मेसेज पाठवण्यात आला. त्यानंतर पुन्हा कॉल आल्यानंतर समोरून,
“मी बिश्नोई गँगमधून शुभम लोणकर बोलतोय. गुगलवर सर्च कर, बिश्नोई गँग कोण आहे ते कळेल. पुढे मेसेजवर बोलेन,” असे सांगून फोन कट करण्यात आला. यानंतर वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय नंबरवरून सतत कॉल येऊ लागले. सुरुवातीला हा प्रकार कोणी तरी मस्करी करत असल्याचा अंदाज सनी वाघचौरे यांनी घेतला. मात्र २६ जानेवारी रोजी सकाळी थेट धमकीचा मेसेज आल्यावर प्रकरणाचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आले.

“पाच दिवसांची मुदत… नाहीतर हत्या…”

धमकीच्या मेसेजमध्ये पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी पाच दिवसांची मुदत देण्यात आली असून, रक्कम न दिल्यास बाबा सिद्दिकीसारखी हत्या करण्याचा थेट इशारा देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

‘गोल्डन मॅन’सनी नाना वाघचौरे कोण ?

सनी वाघचौरे हे सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर सोन्याचे दागिने परिधान करत असल्याने ते ‘गोल्डन मॅन’ म्हणून ओळखले जातात. सोशल मीडियावरही त्यांची मोठी ओळख असून, लाखो लोक त्यांना फॉलो करतात. सोशल मीडियावर त्यांचे तब्बल २५ मिलियन फॉलोअर्स आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात तपास सुरू केला आहे. धमकी देण्यात आलेल्या मोबाइल नंबरचा तपास, कॉल डिटेल्स आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच, संबंधित व्यक्तीच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, पुढील चौकशीत आणखी काय माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---