---Advertisement---
चाळीसगाव तालुक्यातील घोडेगाव (खराडी) ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये विकासकामांच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप करत ग्रामस्थांनी प्रशासनाचे दरवाजे ठोठावले आहेत. या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी श्री. अजितकुमार भीमराव महाले आणि श्री. आबा छबुलाल जाणे यांनी आज, २४ फेब्रुवारीपासून जिल्हा परिषद जळगाव समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
ग्रामपंचायतीने अंगणवाडी साहित्य खरेदी, एलईडी बल्ब बसवणे आणि विशेषतः पाईपलाईन टाकण्याच्या कामात मोठा अपहार केल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. प्रत्यक्ष जमिनीखाली ५० पाईप टाकले असताना कागदोपत्री १५० पाईपचा वापर दाखवून शासनाची फसवणूक करण्यात आली आहे. तसेच, सरपंच आणि ग्रामसेवकांनी संगनमताने बोगस सह्या करून ई-टेंडर प्रक्रिया राबवल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला. जोपर्यंत विशेष चौकशी समिती नेमली जात नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.









