---Advertisement---
सध्या महाराष्ट्रात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. राज्यभरात पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. अशात हवामान विभागाने पुढील चार दिवस संपूर्ण राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला असून. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे मात्र नंदुरबार जिल्ह्यात असलेला वाल्हेरी धबधबा प्रवाहित झाला असतांना येथे प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचे समोर येत आहे. यामुळे अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत असून पर्यटकांकडून पोलीस बंदोबस्ताची मागणी होत आहे.
राज्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरू असल्याने नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. जळगाव जिल्ह्यातील महत्वाच्या तिघंही धरणांची पाणी पातळी वेगाने वाढत आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेला वाल्हेरी धबधबा प्रवाहित झाल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. नंदुरबार जिल्ह्यासह शेजारील मध्य प्रदेश आणि गुजरात मधूनही मोठ्या संख्येने पर्यटक आनंद घेण्यासाठी येत आहेत. मात्र, प्रशासनाकडून येथे कोणतीही उपाययोजना नसल्याने अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे पर्यटकांकडून पोलीस बंदोबस्ताची मागणी केली जात आहे.
महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा
हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आज पुण्यातील काही भागांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच रत्नागिरी, रायगड, भंडारा, गोंदिया, नाशिक आणि सातारा या जिल्ह्याना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.