---Advertisement---
नवी दिल्ली : ओमानच्या किनारपट्टीजवळ १२ भारतीय खलाशी असलेल्या एका रसायनाने भरलेल्या टँकरवर इराणच्या तटरक्षक दलाने हल्ला केला आहे. टँकरवर टोगो देशाचा ध्वज होता. या घटनेत सर्व खलाशी सुरक्षित असल्याची बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने सांगितले.
मंत्रालयाचे संचालक मनदीप सिंग रंधावा यांनी पत्रपरिषदेत सांगितले की, रविवारी टोगोचा ध्वज असलेल्या एमटी सायरन या टँकरवर इराणच्या तटरक्षक दलाने गोळीबार केला. या जहाजावर १२ भारतीय खलाशी तैनात होते. ओमानमधील शिनास बंदराच्या बाह्य हद्दीत ही घटना घडली.
हे जहाज इतर जहाजांच्या ताफ्यासोबत जात असताना त्यावर गोळीबार झाला. सुदैवाने, जहाजावरील सर्व भारतीय खलाशी सुरक्षित आहेत. जहाजबांधणी मंत्रालय या प्रकरणावर परराष्ट्र मंत्रालय, भारतीय दूतावास आणि इतर संबंधित घटकांशी समन्वय साधून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आम्ही परराष्ट्र मंत्रालय आणि सागरी भागधारकांच्या सतत संपर्कात आहोत. खलाशांची सुरक्षा आणि सागरी ऑपरेशन्स सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्या भागातील सर्व भारतीय खलाशी सुरक्षित आहेत.









