---Advertisement---
धुळे (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत चाललेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील तीन गावांनी एक अनोखा आणि प्रेरणादायी निर्णय घेतला आहे. बारीपाडा, मोहगाव आणि चावडीपाडा या गावांनी ग्रामसभेत ठराव मंजूर करत पुढील सहा महिन्यांसाठी एलपीजी गॅसचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
आखाती देशांमधील युद्धजन्य तणावामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होत असून जागतिक बाजारात इंधन दर वाढत आहेत. भविष्यात इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन या गावांनी इंधन बचतीसाठी पुढाकार घेतला आहे. ग्रामीण भागातून देशहितासाठी दिलेला हा संदेश सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे.
या संदर्भात आयोजित बैठकीत तिन्ही गावांतील ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच व विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वानुमते ठराव मंजूर करताना ‘देशहित सर्वोच्च’ ही भूमिका स्पष्टपणे मांडण्यात आली. शहरांमध्ये पर्यायी इंधन स्रोतांची मर्यादा असल्याने ग्रामीण भागाने त्याग करण्याचा निर्णय घेतल्याचेही बैठकीत नमूद करण्यात आले.
गावकऱ्यांकडे पारंपरिक चुली, लाकूड, गोवऱ्या यांसारखे पर्याय उपलब्ध असल्याने त्यांचा वापर वाढवण्यात येणार आहे. महिलांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार असून काही ठिकाणी सामूहिक स्वयंपाक केंद्र उभारण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला.
या बैठकीला बारीपाडाचे सरपंच अनिल पवार, मोहगावचे सरपंच लक्ष्मण महाले, चावडीपाडाचे सरपंच रमण बहिरम, तसेच इतर मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पद्मश्री चैत्राम पवार यांच्या उपस्थितीने या निर्णयाला अधिक बळ मिळाले.
गावकऱ्यांनी या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत केले असून ‘देशासाठी थोडा त्याग करण्याची हीच वेळ आहे’ अशी भावना व्यक्त केली जात आहे. काही ग्रामस्थांनी हा उपक्रम सहा महिन्यांनंतरही सुरू ठेवण्याची तयारी दर्शवली आहे.









