---Advertisement---
जळगाव : महिलांमध्ये वाढत चाललेल्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या धोक्याला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि जळगाव महानगरपालिकेच्या वतीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. शहरातील मुलींचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून, खासगी रुग्णालयात सुमारे ५ ते ७ हजार रुपये किंमतीची असलेली ही लस आता महापालिकेतर्फे मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे.
छत्रपती श्री शाहू रुग्णालयातून मोहिमेला सुरुवात
जळगाव येथील छत्रपती श्री शाहू रुग्णालयात आयोजित कार्यक्रमातून या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील तसेच महिला व बालकल्याण सभापती सिंधुताई कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते लसीकरण केंद्राचे उद्घाटन करून मुलींना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
मुलींच्या आरोग्यासाठी महत्त्वाची योजना
गर्भाशय मुखाचा कर्करोग हा महिलांमध्ये आढळणाऱ्या गंभीर आजारांपैकी एक आहे. योग्य वयात HPV लस घेतल्यास या आजाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्यांना परवडत नसलेली ही लस शासनाने मोफत उपलब्ध करून दिल्याने गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांतील मुलींना मोठा दिलासा मिळणार आहे.
पालकांना आवाहन
महानगरपालिकेच्या वतीने १४ वर्षांवरील सर्व पात्र मुलींनी जवळच्या महापालिका आरोग्य केंद्रावर जाऊन ही लस घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा, असेही प्रशासनाने नमूद केले आहे.









