“मी स्वतः गोळ्या घालतो…” मनोज जरांगे यांना जीवे मारण्याची धमकी; ऑडिओ क्लिप ने बीडमध्ये उडवली खळबळ…!

---Advertisement---

 

बीड जिल्ह्यातून पुन्हा एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालून ठार मारण्याची उघड धमकी देण्यात आल्याचा दावा करणारी कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

ही कथित कॉल रेकॉर्डिंग जरांगे समर्थक आणि वाल्मीक कराड समर्थक यांच्यातील असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या ऑडिओ क्लिपची अधिकृतपणे कोणतीही पुष्टी झालेली नाही. तरीही, क्लिपमधील संभाषण अत्यंत गंभीर आणि जीवघेण्या धमक्यांनी भरलेले असल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.

व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये संभाषण काय आहे ?

व्हायरल झालेल्या ऑडिओमध्ये एक व्यक्ती थेट मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालून मारण्याचा दावा करताना ऐकू येत आहे. संभाषणादरम्यान धनंजय मुंडे तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड यांची नावेही घेतली जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. इतकेच नाही, तर मनोज जरांगे यांचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीलाही फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे या क्लिपमध्ये ऐकू येते.

व्हायरल ऑडिओ क्लिपमधील संभाषण (संक्षिप्त) :

जरांगे समर्थक: पाटलांना काय करणार?
कराड समर्थक: मनोज जरांगे यांना कधी गोळ्या घालायच्या ते सांग, मी स्वतः गोळ्या घालतो.
जरांगे समर्थक: तूच घालणार आहेस का?
कराड समर्थक: हो, मी स्वतः घालतो.
कराड समर्थक: मी तर मनोज जरांगे यांना जीवे ठारच मारतो.
जरांगे समर्थक: बरं चालतंय बर…

दरम्यान या कथित धमकीमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बीड जिल्ह्यात तणावाचे वातावरण होण्याची शक्यता आहे.  या ऑडिओ क्लिपनंतर बीड जिल्ह्यात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. संबंधित कॉल करणारी व्यक्ती नेमकी कोण आहे, तसेच हा ऑडिओ खरा आहे की बनावट, याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. यापूर्वीही मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप करत काही नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. त्या प्रकरणात काही अटकाही झाल्या होत्या. मात्र, सद्यस्थितीत या नव्या ऑडिओ क्लिपमुळे पुन्हा एकदा वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

सध्या तरी या व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत पोलीस प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता तपास होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तरुण भारत लाईव्ह या कथित ऑडिओ क्लीपची पुष्टी करत नाही….

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---