---Advertisement---
Chhagan Bhujbal on PNG: आखाती देशांमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असताना राज्य सरकारकडून महत्त्वाची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, सध्या राज्यात एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले. मात्र, भविष्यातील गरज लक्षात घेऊन पाइप नॅचरल गॅस (PNG) कनेक्शनकडे वळण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.
भुजबळ यांनी सांगितले की, भारत सरकारच्या निर्देशानुसार राज्यात PNG नेटवर्कचा विस्तार अधिक वेगाने करण्यात येत आहे. येत्या तीन महिन्यांत ज्या भागांमध्ये PNG सुविधा उपलब्ध आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कनेक्शन देण्यावर भर दिला जाणार आहे. याचबरोबर, शक्य असूनही PNG कनेक्शन घेतले नाही, तर संबंधित भागात LPG गॅसचा पुरवठा बंद होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
आखाती देशांमधील युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधन तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली असून त्याचा परिणाम भारतावरही होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले. अनेक शहरांमध्ये LPG साठी रांगा लागल्याच्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली असली, तरी राज्यात सध्या गॅसचा पुरेसा साठा असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले. अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी नागरिकांना आवाहन केले.
याच पार्श्वभूमीवर, पंतप्रधान पातळीवर विविध देशांशी चर्चा सुरू असून इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. हार्मोजच्या खाडीतून भारतीय जहाजांना विशेष परवानगी मिळत असल्यामुळे पुरवठा साखळी कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, अनेक नागरिकांनी PNG सुविधा उपलब्ध असूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचे निरीक्षण नोंदवत, त्यांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन केले. नागरिकांनी आपल्या पत्त्यासह पुरवठा विभागाकडे अर्ज सादर करावा आणि संबंधित अधिकाऱ्यांनी ते अर्ज तातडीने गॅस कंपन्यांकडे पाठवावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.
भुजबळ यांनी स्पष्ट केले की, हा निर्णय सर्वांसाठी लागू होणार नाही. ज्या भागात PNG सुविधा उपलब्ध आहे, तेथेच हा नियम लागू होईल. इतर ठिकाणी LPG पुरवठा पूर्ववत सुरू राहणार आहे. याशिवाय, रेशनवरील अन्नधान्याचा पुरेसा साठा असल्याचे सांगत नागरिकांनी गरजेनुसार तीन महिन्यांचे धान्य घ्यावे, असेही त्यांनी सुचवले.
एकूणच, बदलत्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा वापराच्या पद्धतीत बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न असून, नागरिकांनीही त्याला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.









