---Advertisement---
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिज व वाळूचा अवैध उपसा सुरु असून सर्रासपणे विक्री होत आहे. तालुक्यातील बोहरे गावात अवैध वाळू उपसा आणि त्याची वाहतूक पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू काढली जात असून ती ट्रॅक्टरच्या माध्यमातून नेली जात आहे. विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रकार उशिरापर्यंत सुरू राहतो, त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
ग्रामस्थांनी सांगितले की, गावातील अंतर्गत रस्त्यांवर ट्रॅक्टरची सतत ये-जा सुरू असल्याने रस्त्यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. त्यातच रात्रीच्या वेळी होणारा मोठा आवाज, उडणारी धूळ आणि वेगाने धावणारी वाहने यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेची चिंता वाढली आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि शेतकरी यांना याचा त्रास सहन करावा लागत असून गावात नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या प्रकाराबाबत संबंधित विभागाला वारंवार कळवूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. त्यामुळे या अवैध कारवायांमागे कोणाचे पाठबळ आहे, असा सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.









