---Advertisement---
शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील चौघुले प्लॉट भागात प्रशासनाच्या संथ कारभारामुळे नागरिकांच्या जिवावर बेतण्याची वेळ आली आहे. गेल्या काही दिवसांपासून जलवाहिनी टाकण्याचे काम अत्यंत कासवगतीने सुरू असून, शुक्रवारी या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यामुळे एक महिला दुचाकीवरून पडून किरकोळ जखमी झाली.
शुक्रवारी सकाळी चौघुले प्लॉटकडून कांचननगराकडे एक दुचाकीस्वार जात होता. रस्ता खोदल्यामुळे सर्वत्र सिमेंटचे दगड आणि माती पसरली आहे. या खडबडीत रस्त्यावरून जाताना दुचाकीस्वाराचा तोल गेला आणि मागे बसलेली महिला थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारीजवळ पडली. या अपघातात महिलेला किरकोळ दुखापत झाली आहे.
कामाचा वेग कासवगती
चौघुले प्लॉट भागात नळांना पाणी येत नसल्याची तक्रार अनेक दिवसांपासून नागरिकांची होती. त्यावर उपाय म्हणून नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र, हे काम ज्या वेगाने व्हायला हवे होते, त्याऐवजी ते अत्यंत संथगतीने सुरू आहे. रस्ता खोदून ठेवल्यामुळे स्थानिक रहिवाशांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे.









