---Advertisement---
जळगाव : शहरात विविध हॉस्पिटलद्वारे बायो मेडिकल कचऱ्याची योग्य त्या प्रकारे विल्हेवाट लावली जात नसल्याचे प्रकार समोर येत आहे. अशाच प्रकारे बायोमेडिकल कचऱ्याचे अयोग्य व्यवस्थापन केल्याने दोन हॉस्पिटलवर मनपा आरोग्य विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली.
शहरातील दोन हॉस्पिटल यांना बायोमेडिकल कचऱ्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली नाही म्हणून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यात ब्रुक बॉण्ड कॉलनीतील यमुनाई हॉस्पिटल व महेश प्रगती चौकातील सिग्मा हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर यांचा समावेश आहे. या दोघा हॉस्पिटल्सवर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने दंडात्मक कारवाई केली. या हॉस्पिटल व्यवस्थापकांनी बायो मेडिकल कचऱ्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण न करता, वापरलेल्या सिरींज, नळ्या, मास्क आदी कचरा घरगुती कचऱ्यात मिसळल्याचे निदर्शनास आले.
यामुळे घनकचरा व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत कार्यवाही करण्यात आली. ही कारवाई सहाय्यक आयुक्त उदय पाटील व मुख्य स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे यांच्या आदेशाने पार पडली. कार्यवाही दरम्यान आरोग्य निरीक्षक ललित बऱ्हाटे, सुरज तांबोळी, मोकदम चेतन जावळे, राहुल गायकवाड, शुभम सोनवणे यांच्या पथकाने एकूण प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.