‘पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन; तीन दिवस शांती निर्माणावर मंथन

---Advertisement---

 

गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पीस बिल्डर्स फोरम’ या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन उत्साहात पार पडले. गांधी तीर्थ येथील कस्तुरबा सभागृहात कस्तूरबा गांधी व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
उद्घाटनप्रसंगी कांताई नेत्रालयाच्या संचालिका डॉ. भावना जैन, गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या डॉ. गीता धरमपाल, एकता परिषदेचे अध्यक्ष राजगोपाल, जिल कारहॅरीस, सावित्रीबेन, इंद्राजी यांची प्रमुख उपस्थिती होती.

दि. ९ ते ११ मार्च दरम्यान चालणाऱ्या या तीन दिवसीय परिषदेत शांती निर्माण, सामाजिक न्याय व परिवर्तन या विषयांवर विविध सत्रांमध्ये चर्चा होणार आहे. परिषदेत माहितीपट प्रदर्शन, संवाद सत्रे व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. कॅनडा तसेच आंध्रप्रदेश, केरळ, बिहार, तामिळनाडू, ओडिसा, मणिपूर, नागालॅंड, महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, झारखंड, तेलंगणा व गुजरात या राज्यांमधील पीस वर्कर्स व सामाजिक कार्यकर्ते या परिषदेत सहभागी झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कार्यक्रमात विशेष सांस्कृतिक सादरीकरणही करण्यात आले. डॉ. अपर्णा भट-कासार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाकर कला संगीत अकॅडमीच्या विद्यार्थिनींनी कथक नृत्य सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. वंदे मातरम् या गीताने नृत्याची सुरुवात झाली. देवी स्तुतीद्वारे आदिशक्तीला वंदन करत महिला शक्तीचा गौरव करण्यात आला. त्यानंतर कृष्ण भजनाच्या सादरीकरणातून भक्तीमय वातावरण निर्माण झाले.

या सादरीकरणात श्रेया अग्रवाल, तेजस्विनी क्षीरसागर, संस्कृती गवळे, मधुरा इंगळे, दीपिका घैसास, समृद्धी पाटील व वरदा तळेले यांनी सहभाग घेतला.
डॉ. गीता धरमपाल यांनी महिला दिनानिमित्त संदेश देत गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. समन्वयक जिल कारहॅरीस यांनी शोध, संवाद, प्रशिक्षण व युवकांच्या सहभागातून समाजात शांती, न्याय व सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी एकता परिषद व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे कार्य महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.
यावेळी २०१६ मध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय महिला परिषदेवरील विशेष माहितीपटही प्रदर्शित करण्यात आला. दीपक मिश्रा यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---