---Advertisement---
पुण्यातून एक आश्चर्यकारक आणि संतापजनक घटना समोर आली आहे, पुणे शहरातील विमान नगर परिसरात महापालिकेच्या अधिकृत बोर्डावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोवरच थेट जाहिराती चिकटवण्यात आल्या आहेत. हा प्रकार उघडकीस येताच संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांदरम्यान शहरभर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी पाहायला मिळाली. प्रचाराच्या उत्साहात अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसवले गेले. मात्र, शिवरायांच्या प्रतिमेवर जाहिरात चिकटवण्याची घटना कुणालाही धक्का देणारी ठरली आहे.

महापालिकेच्या बोर्डावर आधीपासूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावण्यात आला होता. मात्र, अज्ञात व्यक्तींनी त्या फोटोवरच व्यावसायिक स्वरूपाची जाहिरात लावल्याचं निदर्शनास आलं. हा प्रकार समजताच शिवप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त करत तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत एअरपोर्ट पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शिवरायांचा अपमान करणाऱ्या अशा प्रकारांवर प्रशासन काय कारवाई करतं, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.









