जळगावात स्वयंस्फूर्त रक्तदानाचे आवाहन; गंभीर रुग्णांना जीवनदान देण्यासाठी पुढाकार

---Advertisement---

 

, दि. ३ एप्रिल २०२६ — तप्त उन्हाळ्यामुळे रक्तपुरवठा खंडित होण्याची समस्या निर्माण होत असताना, गंभीर व पीडित रुग्णांना जीवनदान मिळावे यासाठी रक्तदानाची गरज अधोरेखित करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत मुकुंद गोसावी यांनी रक्तदान करून नागरिकांना प्रेरणादायी आवाहन केले आहे.


श्री हनुमान जयंती तसेच आपल्या आई-वडिलांच्या पुण्यस्मरणार्थ मुकुंद गोसावी यांनी रक्तदान करत जनजागृतीचा अनोखा संदेश दिला. शारीरिक व्यंगावर मात करून त्यांनी केलेले हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.


यावेळी त्यांनी सांगितले की, रक्तदान केल्याने कोणताही त्रास, दुष्परिणाम किंवा कमजोरी येत नाही. उलट मानसिक समाधान, आनंद आणि स्फूर्ती मिळते. तसेच रक्तदानानंतर विशेष आहाराची गरज नसून, नियमित घरगुती आहारही पुरेसा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आज थॅलेसीमिया, हिमोफिलिया, सिकलसेल यांसारख्या आजारांनी ग्रस्त रुग्ण, रक्तक्षय असलेल्या महिला, गर्भवती माता तसेच प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज असते. मात्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठ्याची कमतरता भासत आहे.


म्हणूनच, १८ वर्षांवरील व किमान ५० किलो वजन असलेल्या प्रत्येक सक्षम व्यक्तीने रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन मुकुंद गोसावी यांनी केले. स्वयंस्फूर्त रक्तदानाच्या माध्यमातूनच अनेकांना नवजीवन मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले.


समाजातील प्रत्येकाने रक्तदानासारख्या पवित्र कार्यात सहभागी होऊन मानवतेचे ऋण फेडावे, असेही आवाहन यावेळी करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---