---Advertisement---
तळोदा तालुक्यातील हलालपूर शिवारात आज सकाळी जखमी अवस्थेत बिबट्याचे पिल्लू आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. तळोदा येथील बबनलाल ताराचंद परदेशी व संजय बबनलाल परदेशी यांच्या शेतातील झोपडीजवळ ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे आठ ते दहा वाजेच्या दरम्यान अनिल परदेशी हे शेतात गेले असता त्यांना झोपडीजवळ जखमी अवस्थेत बिबट्याचे पिल्लू दिसून आले. त्यांनी तत्काळ वन विभागाला याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. सोनवणे, वनरक्षक गिरधन पावरा, गोवर्धन वसावे तसेच वाहनचालक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने बिबट्याच्या पिल्लाला ताब्यात घेऊन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी केली असता पिल्लू सध्या चांगल्या स्थितीत असल्याचे सांगण्यात आले.
परिसरात सध्या ऊसतोड सुरू असून उसाच्या शेतातील पालापाचोळा जाळण्यासाठी लावलेल्या आगीत हे पिल्लू होरपळले असावे आणि तेथून हलालपूर शिवारातील परदेशी यांच्या शेतात आले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. तसेच परिसरात बिबट्या किंवा आणखी पिल्ले असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने वनविभागाकडून संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवण्यात येत असून ही नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









