---Advertisement---
अमेरिका-इराण-इस्त्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा आज १३ वा दिवस असून त्याचे परिणाम आता संपूर्ण जगावर जाणवू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर Donald Trump यांनी अमेरिकेने इराणविरुद्धचे युद्ध जिंकल्याचा दावा केला आहे. केंटकी येथील सभेत बोलताना त्यांनी सांगितले की अमेरिकन सैन्याने इराणची लष्करी ताकद मोठ्या प्रमाणात कमकुवत केली आहे. मात्र ध्येय पूर्ण होईपर्यंत लढाई सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, इराणचे अध्यक्ष Masoud Pezeshkian यांनी युद्ध थांबवण्यासाठी तीन अटी मांडल्या आहेत. त्यानुसार इराणचे कायदेशीर हक्क मान्य करणे, युद्धातील नुकसान भरपाई देणे आणि भविष्यात पुन्हा हल्ला होणार नाही याची हमी देणे या अटी पूर्ण झाल्यासच युद्ध संपवता येईल, असे त्यांनी सांगितले. दुसरीकडे Israel ने या प्रस्तावावर अद्याप स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही.
अमेरिकेच्या संरक्षण विभागाने म्हणजेच Pentagon ने संसदेला दिलेल्या माहितीनुसार या युद्धासाठी अमेरिकेने आतापर्यंत सुमारे ११.३ अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत. त्यापैकी सुमारे ५ अब्ज डॉलर्स शस्त्रे आणि दारूगोळ्यावर खर्च झाल्याचे सांगण्यात आले.
तेलाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता
अमेरिका-इराण-इस्त्रायल संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इराणकडून असा इशारा देण्यात आला आहे की कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल २०० डॉलरपर्यंत जाऊ शकते. इराणचे वरिष्ठ लष्करी अधिकारी Ebrahim Zolfaghari यांनी अमेरिका, इस्त्रायल आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांना तेल पुरवठा रोखण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या मते, या देशांकडे जाणारे तेलवाहू जहाजे किंवा टँकर लक्ष्य केले जाऊ शकतात.
तेल टँकरवरील हल्ल्यात भारतीय नागरिकाचा मृत्यू
या संघर्षादरम्यान Iran ने Iraq च्या सागरी हद्दीत असलेल्या तेल टँकरवर हल्ला केला. हा हल्ला खोर अल जुबैर बंदराजवळ झाला. “सफेसी विष्णू” नावाच्या तेल टँकरवर आत्मघातकी बोटीने हल्ला करण्यात आला. या जहाजावर एक भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला असून उर्वरित २७ जणांना सुरक्षितपणे वाचवून त्यांना Basra येथे नेण्यात आले.
सध्या तेलाची किंमत १०१ डॉलरवर
युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. काल ९२ डॉलर प्रति बॅरल असलेली किंमत आता १०१ डॉलर प्रति बॅरल झाली आहे. दरम्यान, International Energy Agency मधील ३२ देशांनी बाजारात ४०० दशलक्ष बॅरल तेल उपलब्ध करण्याची योजना आखली आहे. मात्र Strait of Hormuz येथे जहाज वाहतुकीत अडथळे येण्याची शक्यता असल्याने जागतिक बाजारात अजूनही चिंतेचे वातावरण आहे.









