Jalgaon Crime : शहरातील वाहतूक व्यवस्थेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांशी वाद घालत संशयित कोयतासह त्यांच्या अंगावर धावुन गेला. त्याचा साथीदार लोखंडी साखळी हातात घेत अंगावर धावुन गेला. ही खळबळजनक घटना शनिवारी (२१ जून) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास बेंडाळे चौकातील रिक्षास्टॉपजवळ रस्त्यावर घडली.
या गुन्ह्यात पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेत अटक केली. शहर वाहतूक शाखेचे कॉन्सटेबल ज्ञानेश्वर कोळी यांच्यासह त्यांचे अन्य सहकारी बेंडाळे चौकातील राणी लक्ष्मीबाई पुतळ्याजवळ वाहतूक व्यवस्थेसंदर्भात कर्तव्य बजावत होते. या चौकात आलेल्या पाच जणांनी पोलिसांशी वाद घातला.
कर्तव्य बजावत असल्याची जाणीव करुन दिल्यानंतरही संशयित नरमले नाहीत. पोलिसांना शिवीगाळ करत एका संशयिताने (एमएच १९ बीएन ००७८) या दुचाकीच्या डिक्कीतून धारदार लोखंडी कोयता आणि एक त्याचा साथीदार लोखंडी साखळी घेत या पोलिसांच्या दिशेने अंगावर धावुन गेले. धक्काबुक्की केली.
शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कॉन्सटेबल ज्ञानेश्वर कोळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शनिपेठ पोलीस ठाण्यात अल्ताफ अहमद अब्दुल गफुर (वय ६४), मुजम्मील अहमद अल्ताफ अहमद रंगरेज (वय ३०), जुबेर अहमद अल्ताफ अहमद रंगरेज (वय ३८, तिघे रा. बालाजीपेठ) अरुण रामदास टिलोरे (वय ६७, रा. समतानगर), आदिल बेग शरीफ बेग (वय २७, रा. रामनगर) यांच्यावर शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
घटना कळताच पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी धाव घेतली. त्यानंतर दाखल गुन्ह्यात वेगाने तपास चक्र फिरवित सर्व संशयितांना ताब्यात घेऊन अटक केली. उपनिरीक्षक योगेश ढिकले हे तपास करीत आहेत.