Jalgaon Crime : महिला व्यापाऱ्याची फसवणूक, एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव : व्यवसाय करतांना अनेक अडचणी येत असतात. काही व्यापाऱ्यांना आर्थिक फसवणुकीला सामोरे जावे लागत असते. असाच प्रकार पिंप्राळा परिसरातील संत मिराबाई नगरात वास्तव्याला असलेल्या महिला व्यापाऱ्यासोबत घडला आहे.  महिला व्यापारी  कांचन सुरेश येवले यांची 2 लाख 34 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कांचन येवले (वय 38) ह्या पशूखाद्य खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्यासोबत संशयित आरोपी गोरख कैलास दुधरे (रा. गल्ले बोरगाव, खुलताबाद, छत्रपती संभाजी नगर) याने संपर्क साधला. त्याने व्यवसाय करण्यासाठी त्यांच्याकडून 170 गोण्या पशुखाद्याच्या ट्रकमध्ये पाठवून देण्याची मागणी केली.  कांचन येवले यांनी आरोपीवर विश्वास ठेवून 2 लाख 34 हजार रुपये किंमतीच्या पशुखाद्याच्या 170 गोण्यांचा ट्रक स्वतः जाऊन आरोपीला दिल्या.

त्यानंतर, दिलेल्या ऑर्डरप्रमाणे पैसे न देता आरोपीने महिलेची फसवणूक केली. महिलेने आपल्या फसवणुकीचा शोध घेतल्यानंतर 30 डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारावर संशयित आरोपी गोरख कैलास दुधरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार विजय पाटील पुढील तपास करीत आहेत.