---Advertisement---
Jalgaon : शहरातील मेहरूण परिसरात धुलिवंदनाच्या दिवशी दोन गटांमध्ये जुना वाद उफाळून आल्याने तुफान हाणामारीची घटना घडली. ही घटना साईबाबा मंदिर चौकात घडली असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून सुरू झालेला वाद अचानक तीव्र झाला आणि दोन्ही गटांमध्ये मारहाण झाली. यावेळी किरकोळ दगडफेक झाल्याचीही माहिती समोर आली आहे. काही ठिकाणी घरांच्या गेटची तोडफोड करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.
या घटनेत दोन जण जखमी झाले असून, त्यामध्ये भाजपाचे नगरसेवक सुनील महाजन यांचे बंधू भरत महाजन यांचा समावेश आहे. त्यांना गंभीर दुखापत झाल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगविले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता एमआयडीसी पोलिस ठाण्याबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दंगा नियंत्रण पथकही सज्ज ठेवण्यात आले होते.
दरम्यान, पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून दोन्ही गटांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सध्या परिसरातील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.









