जळगाव : दोन महिन्यापूर्वी आजीच्या घरात चोरी गुन्हा घडला होता. हा गुन्हा उलगडण्यास पोलिसांना यश आलं आहे. यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही चोरीची घटना बाहेरील चोरटयांनी नव्हे, तर आजी नातवानेच केल्याचे उघड झाले. चाेरीचा मुद्देमाल विक्रीसाठी आला असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला बळीराम पेठेतून अटक केली असून त्याच्याकडून सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.
गोदावरी पंडित पाटील (८८) या आजी शिवाजीनगरात एकट्याच राहतात. त्यांच्या घरी २३ ऑगस्ट रोजी त्यांची मुलगी आणि नातू हे आले होते. घरात झोपलेले असताना त्यांचा नातू योगेश पाटील याने कपाटातून आजीचे ६ लाख २ हजार १४० रुपयांचे सोने आणि २० हजार रुपयांची रोकड असे चोरुन नेली होती. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या चोरीच्या गुन्ह्याचा तपास करण्याची सूचना पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वरी रेड्डी यांनी दिल्या होत्या. यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संशयिताचा शोध घेत होते. यातच संशयित योगेश पाटील हा चोरलेले दागिने विक्रीसाठी बळीराम पेठ परिसरात फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार योगेशची झडती घेतली असता, त्याच्याकडे चोरलेले दागिने सापडले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने हे दागिने आजीच्या घरुन चोरी केल्याची कबुली दिली.
पथकाने दागिने जप्त करून संशयिताला शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. पुढील तपास सपोनि रामचंद्र शिखरे करीत आहेत. ही कारवाई पोउनि गणेश वाघमारे, दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी, संजय हिवरकर, हरिलाल पाटील, विजय पाटील, रवी नरवाडे, राजेश मेढे, प्रदीप सपकाळे यांनी केली.