Jalgaon Crime News: व्हिडिओ व्हायरलची धमकी देत मुलीवर अत्याचार, मदत करणाऱ्या तिघा मित्रांवर गुन्हा

 जळगाव :  १७ वर्षीय मुलीशी ओळख करून मैत्री केली. त्यानंतर तिच्याशी जबरीने शारीरिक संबंध केले. या व्हिडिओसह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिला मध्य प्रदेशात पळवून नेले. वारंवार तिचे जबरीने शारीरिक शोषण केले. हा खळबळजनक प्रकार एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. या गैरकृत्यात संशयिताला मदत करणारे त्याचे तीन मित्र कायद्याच्या कचाट्यात आले असून संशयित मुख्य आरोपीसह या त्रिकुटावर २५ रोजी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला.

१४ जानेवारी २०२४ ते २० जानेवारी २०२५ या दरम्यान संशयित नितेश धनराज राठोड याने पीडित मुलीला मैत्री करण्याचा बहाणा करत शिरसोली जंगलात तसेच मध्य प्रदेशातील इंदूर येथे नेले. या ठिकाणी त्याने तिच्यावर जबरी संबंध केले. संशयिताने या मुलीचा एकटीचा तसेच तिच्यासोबत अश्लील फोटो व व्हिडिओ काढला. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि आईवडिलांना मारून टाकण्याची धमकी देत तिच्यावर त्याने वारंवार अत्याचार केला.


पीडितेने ही सारी कैफियत पोलीस ठाण्यात मांडली. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे, उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांनी प्रत्यक्ष पीडितेची भेट घेतली. मुलीला पळवून नेण्याच्या कृत्यात संशयिताच्या कृत्याला मदत करणारे त्याचे मित्र गोविंद रामसिंग राठोड, ज्ञानेश्वर भावलाल चव्हाण, गोरख थानसिंग चव्हाण तसेच मुख्य संशयित नितेश राठोड यांच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे करीत आहेत.