जळगाव : शहरातील एका भागात रात्री अमली पदार्थांची सर्रास विक्री केली जात असल्याही प्रकार उघड झाला आहे. हा अमली पदार्थ सहजपणे तरुण व लहान मुलांना उपलब्ध होत असल्याने त्यांच्यात व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्याने पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठून आपली कैफियत मांडली. हा अमली पदार्थ ड्रग असल्याची शंका स्थानिक नागरिकांनी व्यक्त करण्यात येत आहे.
मेहरूण परिसरातील शेरा चौकात रात्री साडेदहा वाजेनंतर एका पुडीत अमली पदार्थ विक्री केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुज्ञ नागरिकांनी हा प्रकार उघडकीस आणला. शुक्रवारी परिसरातील नागरिकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. शुक्रवार, १ रोजी मशिदीत नमाज पठण केल्यानंतर समाजबांधव बाहेर पडले असता रात्री चौकात लहान पुडीत अमली पदार्थाची विक्री केली जात असल्याची, अशी माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कैफियत मांडली.
रात्री साडेदहा वाजेनंतर शेरा चौकात अमली पदार्थाच्या पुडीची विक्री केली जाते. अनेक तरुण तसेच मुले ही पुडी घेत आहेत. एक वेळा पुडी घेतल्यानंतर व्यसन करणारा वारंवार ही पुडी घेतो. यासाठी वाटेल ते करून तो पैशांची व्यवस्था करतो, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. हा प्रकार त्वरित थांबविण्यात यावा, यासाठी पोलीस ठाण्यात मागणी निवेदन दिले, असेही स्थानिक नागरिकांनी सांगितले.
काय आहे प्रकार
जळगाव तसेच भुसावळ येथे पोलिसांच्या कारवाईतून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. शेरा चौकात पुडीतून विकला जाणारा पदार्थ ड्रग्स असण्याची शक्यता स्थानिकांच्या चर्चेतून व्यक्त केली जात आहे. रात्री साडेदहा वाजेनंतर या पदार्थाची विक्री केली जात आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.