---Advertisement---

Jalgaon Crime : व्याजाने घेतलेल्या पैशांवरून सावकाराकडून मारहाण एकास अटक, एक फरार ; शहर पोलिसात गुन्हा दाखल

---Advertisement---

Jalgaon Crime : दहा टक्के प्रतीमहिना व्याजाने घेतलेल्या पैशांवरून एका व्यापाऱ्याला सावकाराने त्याच्या साथीदारासह बेदम मारहाण केल्याची घटना जळगाव शहरातील गोलाणी मार्केट परिसरात घडली आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून एकास अटक करण्यात आली आहे.

याबाबत महेश अशोक मराठे (वय ४४, रा. शनिपेठ, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा सौंदर्य प्रसाधने विक्रीचा व्यवसाय आहे. सुमारे १० वर्षांपूर्वी त्यांची ओळख सागर सपके (रा. कोंबडी मार्केटजवळ, जळगाव) याच्याशी झाली. सागर सपके हा गरजू लोकांना १० टक्के महिना व्याजाने पैसे पुरवण्याचा व्यवसाय करत आहे. सन २०१६ मध्ये व्यवसायासाठी पैशांची गरज असल्याने महेश मराठे यांनी सागर सपके याच्याकडून ९० हजार रुपये १० टक्के महिना व्याजाने घेतले होते.

ते दरमहा ९ हजार रुपये व्याज देत होते. ऑक्टोबर २०१९ मध्ये त्यांनी मूळ रकमेपैकी ५० हजार रुपये एकरकमी परत केले होते, तसेच एकदा २० हजार रुपये आणि दोनदा १० हजार रुपये असे एकूण ९०,००० रुपये परत केले असल्याचे महेश मराठे यांनी नमूद केले आहे. असे असताना बुधवारी (२८ मे) सायंकाळी ४.३० वाजता महेश मराठे गोलाणी मार्केटमधील मित्राच्या मोबाईल शॉपवर जात असताना, इंडो अमेरिकन हॉस्पिटलजवळ सागर सपके आणि त्याचा साथीदार राधेश्याम शर्मा (रा. अयोध्या नगर, जळगाव) यांनी त्यांना बुलेटवरून (क्रमांक एमएच १९- बीवाय ११११) थांबवले.

या वेळी सागर सपके याने शिवीगाळ करत, “तुझी फार नाटके झाली, सोबत चल,” असे म्हणत त्यांना कोंबडी बाजार येथील राहत्या घरासमोर सायंकाळी ५ वाजता नेले. त्या ठिकाणी राधेश्याम शर्मा याने पत्र्यावर ठेवलेला प्लास्टिकचा नळाचा पाइप काढून सागर सपकेच्या हातात दिला. सागर सपकेने त्या पाइपने महेश मराठे यांच्या पाठीवर, दोन्ही हातांवर, दोन्ही पायांच्या मांडी व पोटरीवर बेदम मारहाण करून दुखापत केली.

ही घटना महेश मराठे यांचा मित्र चेतन कासार आणि चुलत भाऊ मोहित मराठे यांच्यासमोर घडली. त्या वेळी सागर सपके आणि राधेश्याम हे, “पैसे न दिल्यास मारून टाकू.” अशी धमकी देत होते. महेश मराठे यांनी जीवाच्या भीतीने राहिलेले पैसे देण्याची तयारी दर्शवली. सागर सपकेने त्यांना “पैसे न दिल्यास उडवून टाकेन,” अशी जिवे ठार मारण्याची धमकीही दिली. मारहाणीनंतर महेश मराठे यांनी आपल्या भाऊ आणि मित्र चेतन कासार यांच्यासह पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी धाव घेतली.

पोलिसांनी त्यांना वैद्यकीय उपचारासाठी पाठवले. उपचारानंतर महेश मराठे यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. यात एकास अटक करण्यात आली तर दुसरा फरार आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment