---Advertisement---
नुकत्याच पार पडलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत राज्यासह भाजपला मोठ्या प्रमाणात यश मिळालं. जळगाव महानगरपालिकेतही महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत सभागृहात एकहाती सत्ता स्थापन करत आपले राजकीय वर्चस्व अधोरेखित केले आहे. मात्र सत्ता स्थापन झाल्यानंतर आता महापौर आणि उपमहापौर पदावर कोणाची वर्णी लागणार ? याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आरक्षणाचे गणित, पदांचे वाटप आणि अंतर्गत समीकरणांमुळे सध्या सत्ताधारी गोटातच हालचालींना वेग आला आहे.
जळगावात महायुतीला अपेक्षेपेक्षा अधिक जागा मिळाल्याने विरोधकांना सावरायलाही वेळ मिळाला नाही. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट अर्थात महायुती आणि मित्रपक्षांची एकत्रित ताकद मतपेटीत उतरली असली, तरी निवडणूक जिंकण्यापेक्षा सत्ता सांभाळणे अधिक आव्हानात्मक ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एकूणच आरक्षण जाहीर झाल्यानंतर महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी निघेल हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असून, यावर अनेक संभाव्य नावं देखील अवलंबून आहेत. जळगाव शहराचा विकास, निधीचे नियोजन, प्रलंबित प्रकल्प, रस्ते, बेरोजगारीचा प्रश्न, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळातील (MIDC) उद्योगांचा प्रश्न आणि पाणीपुरवठा यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आगामी महापौराची भूमिका ही अत्यंत निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे अनुभव, प्रशासनावर पकड आणि जनसंपर्क असलेला चेहरा मिळावा, अशी अपेक्षा जळगावकर नागरिक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, जळगाव महापालिकेत उपमहापौरपद शिवसेनेलाच मिळणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र त्या पदासाठी नेमका कोण पुढे येणार, यावरून संभ्रम कायम आहे. शिवसेनेतील ज्येष्ठ नगरसेवकांसह तरुण नेतृत्वालाही संधी द्यावी, अशी चर्चा देखील रंगलेली आहे.
दरम्यान, महापौर व उपमहापौर कोण होणार यावर चर्चा रंगत असताना मात्र स्वीकृत नगरसेवकपदासाठीही राजकीय हालचाली वाढल्या आहेत. मात्र हा सत्ताधारी नेत्यांसमोरचा मोठा प्रश्न ठरत आहे. स्वीकृत नगरसेवकांच्या माध्यमातून सत्ता अधिक भक्कम करता येते, हे लक्षात घेऊन भाजप आणि शिवसेनेतील अनेक निष्ठावंतांनी तगडी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
एकूणच, संपूर्ण परिस्थिती पाहता महापालिकेत महायुतीची सत्ता जरी स्थापन झाली असली तरी महापौर, उपमहापौर आणि स्वीकृत नगरसेवकपदांच्या निर्णयाकडे संपूर्ण जळगावचे लक्ष लागले असून, पुढील काही दिवसांत महापौर व उपमहापौर पदासाठी कोणाची वर्णी लागते याचे चित्र स्पष्ट होणार आहे.









