Jalgaon Municipal Corporation News : जळगाव महापालिकेचे संकेतस्थळ गेल्या दोन दिवसांपासून बंद पडले आहे. संकेतस्थळावर क्लिक केले असता सर्व्हर कनेक्ट होत नसल्याचा संदेश संकेतस्थळावरील पानावर दिसत आहे. त्यामुळे संकेतस्थळ महापालिकेनेच ‘बंद’ केले की, ते कोणी ‘हॅक’ केले आहे याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. यासंबंधात महापालिका प्रशासन मात्र अनभिज्ञ असल्याचे दिसत आहे.
कोणत्याही संस्थेचे संकेतस्थळ हे त्या संस्थेच्या कार्यभाराचा, सेवा, सुविधांचा आरसा असतो. नागरिकांसाठीच्या विविध योजना, सेवा सुविधांची त्यात माहिती देत त्यावर नागरिकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाची दखल घेत त्यानुसार त्यांना त्या संस्थेच्या कामकाजात सहभागी करून घेतले जाते. जागतिक स्तरावर संस्थेची माहिती काही सेकंदात पोहचत असते. त्यामुळे संस्था आपली संकेतस्थळे अद्ययावत ठेवत ते कोणत्याही कारणास्तव’ बंद’ पडणे किंवा कोणी ‘हॅक’ करू नये याकडे लक्ष देत असतात. मात्र या सर्व गोष्टींना जळगाव शहर महापालिकेचे संकेतस्थळ अपवाद ठरत आहे.
अपूर्ण माहिती, स्क्ति रकाने
जळगाव शहर महापालिकेच्या www.jcmc.gov.in. या संकेतस्थळावर विविध विभागांची माहिती देण्यात आलेली असली, तरी त्यातील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण असलेले रकाने रिक्त ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे महापालिकेचे संकेतस्थळ सामान्य नागरिकांसाठी निरुपयोगी ठरत आहे.
बदल्यामुळे होतोय कामकाजावर परिणाम
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आणि सहायक आयुक्त यांच्या बदल्या करण्यात आल्यात. त्यांच्याजागी नवीन अधिकाऱ्यांच्याही नियुक्त्या करण्यात आल्यात. मात्र नवीन नियुक्त झालेले अधिकारी बदली झाल्यादिवसापासून तर २ डिसेंबरपर्यंत महापालिकेत रुजू झालेले नव्हते. त्यामुळे बदली झालेल्या अधिकाऱ्यांकडील कार्यभार दोन उपायुक्त व दोन सहायक आयुक्त यांच्याकडे सोपविण्यात आला. आधीचा असलेला कार्यभार आणि पुन्हा नव्याने दिलेला कार्यभार यामुळे अधिकाऱ्यांच्या कामकाजावर परिणाम होत आहे.
संकेतस्थळाबाबतची जबाबदारी निश्चित करण्याची गरज उपलब्ध असलेल्या अधिकाऱ्यांपैकी एका अधिकाऱ्याकडे महापालिकेच्या संकेतस्थळाची जबाबदारी देण्याची गरज आहे. त्यासोबतच संकेतस्थळ रोज अद्ययावत करण्यासाठी तांत्रिक माहिती असलेल्या दोन संगणकचालकांची स्वतंत्रपणे नियुक्ती करण्याची गरज आहे. संकेतस्थळावर येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी, सूचना व इतर कामकाजाबाबतच्या माहितीची दखल घेत त्याची माहिती संबंधित विभागांकडे पाठवून त्याची सोडवणूक करण्याकडे हे अधिकारी व कर्मचारी लक्ष देतील.
पण लक्षात कोण घेणार
महापालिकेचे संकेतस्थळ अद्ययावत करून त्यावर येणाऱ्या नागरिक समस्या तत्काळ सोडविण्याकडे प्रभाग समितीचे प्रभाग अधिकारी, संबंधित विभाग प्रमुख, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्त यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. तरच महापालिकेचे हे संकेतस्थळ नागरिकांच्या उपयोगाचे ठरेल.
तर आयुक्तांकडे येणारी गर्दी शून्य होईल
महापालिकेकडून नागरी सेवा व सुविधा प्रभाग समिती कार्यालयांसह संबंधित विभागप्रमुखांकडून वेळेवर मिळत नसल्याने त्यांची सोडवणूक करावी यासाठी अनेक करदाते नागरिक समस्यांची निवदने घेऊन महापालिकेत येत असतात. त्यासाठी ते थेट आयुक्तांची भेट घेत असतात. मात्र आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर नागरिकांनी आयुक्त कार्यालयात उपस्थित असल्यास ४ ते ५ या वेळेत भेटण्याबाबतचा फलक लावलेला आहे. पण या वेळेत सर्वच नागरिक येत असल्याने दालनात गर्दी होते. तासन्तास या नागरिकांना वाट पाहावी लागत असते. संकेतस्थळावरून जर तक्रारींची सोडवूणक तत्काळ झाली तर आयुक्तांकडे येणारी गर्दी शून्य होईल. त्यामुळे आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाज करण्यास पुरेसा वेळ देता येईल.