Jalgaon News: मित्रांसोबत पोहोण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मेहरुण तलावात पाण्यात बुडुन मृत्यू झाला. महमंद नदीम शेख अनिस (वय 24,रा.तांबापुरा) असे मृत तरुणाचे नाव आहे. शनिवारी बकरी ईदला ( 7 जून) दुपारी ही अप्रिय घटना घडली. ही वार्ता धडकताच तांबापुरा परिसरात शोककळा पसरली. आपत्ती व्यवस्थापन, मनपा अग्नीशमन दलाने तलावात तरुणाच्या शोध मोहिमेला सुरुवात केली. मात्र सायंकाळी सात वाजेपर्यंत मयताचा शोध लागु शकला नव्हता. प्रशासनाच्या दिरंगाईबद्दल नागरिकांनी घटनास्थळी संताप व्यक्त केला.
प्राप्त माहितीनुसार तांबापुरा येथील पाच मित्र बकरी ईदच्या दिवशी (शनिवारी) दुपारी मेहरुण तलावात पोहोण्यासाठी गेले होते. त्यांच्या सोबत महमंद नदीम ही गेला होता. तलावाच्या चौपाटी परिसरात सुरुवातीला चौघे मित्र तलावात उतरले. त्यानंतर ते काठापासुन पाण्यात बऱ्याच दुरपर्यंत पोहत् गेले.दरम्यान नदीम हा पोहण्यासाठी तलावात उतरला. नदीम पाण्यात उतरल्याचे दिसल्यानंतर पोहणाऱ्या तिघांनी पाण्यात पुढे येऊ नको,असा आवाज दिला. तोवर नदीम हा पोहण्याच्या नादात पुढे सरसावला आणि पाण्यात बुडाला.