जळगाव : अंगावर शाल, हाफ पँट परिधान केलेल्या टोळीने एमआयडीसीतील दोन कंपन्यांना लक्ष्य केले. चार लाखांची रोकड घेऊन हे त्रिकूट पसार झाले. शहरातील एमआयडीसीमध्ये हा प्रकार शनिवारी (२२ फेब्रुवारी) मध्यरात्रीनंतर घडला. कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याने या तिघांना कैद केले आहे.
जिग्नेश शरदशेठ यांच्या एमआयडीसीतील ग्रीनइन इको सॉल्युशन कंपनीत पर्यावरणपूरक साहित्य बनविले जाते. वरच्या मजल्यावर ते कुटुंबासह वास्तव्य करतात. कुटुंबातील अन्य सदस्य शुक्रवारी गावाला गेल्याने शनिवारी जिग्नेश हे घरी होते. चोरट्यांनी रात्री दोननंतर कंपनीचे कडी-कोयंडा तोडत आतमध्ये प्रवेश केला. कपाट, काउंटर तपासत त्यांनी मुद्देमालाचा शोध घेतला असता तीन लाखांची रोकड त्यांच्या हाती लागली. त्यानंतर चोरट्यांनी तेथून पलायन केले. या कंपनीलगतच्या आर. जी. एण्टरप्रायजेसकडे या त्रिकुटाने मोर्चा वळविला. पंकज गुणवंत यांच्या मालकीच्या या कंपनीत प्रवेश करत चोरट्यांनी कपाटांमध्ये शोधाशोध केली. त्यांना एक लाख दहा हजारांची रोकड हाती लागली. त्यानंतर चोरटे पसार झाले. सकाळी कामगार कंपनीत आले असता, त्यांना शटर तोडफोड केल्याच्या अवस्थेत दिसले. कामगारांनी तत्काळ जिग्नेश यांना घटनेची माहिती दिली. घरातून जिग्नेश यांनी कंपनीत येत रोकड लांबविल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी जिग्नेश शरद शेठ यांनी या दोन्ही कंपन्यांतील चोरी प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी (२२ फेब्रुवारी) दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक राहल तायडे यांनी घटनास्थळी पाहणी केली. सीसीटीव्हीबद्दल विचारपूस केली. उपनिरीक्षक चंद्रकांत धनके तपास करीत आहेत.
व्यापगारांच्या वेतनासाठी बँकेतून आणली होती रोकड
कंपनीतील कामगारांना शनिवारी पगार दिला जातो. शनिवारी बँक बंद असल्याने जिग्नेश शेठ यांनी शुक्रवारी बँकेतून तीन लाखांची रोकड काढून कंपनीत ठेवली होती. ती चोरट्यांनी रात्री लांबविली. आर. जी. कंपनीतही कामगारांच्या पगारासाठी रोकड कंपनीत आणून ठेवली होती. याही रोकडवर चोरट्यांनी हात मारला.
… तर बेतले असते जीवावर
कंपनीत काहीच हाती लागले नसते, तर चोरट्यांनी वरच्या मजल्यावर मोर्चा वळविला असता. मी घरात एकटाच होतो. त्यांच्या हातात टॉमी तसेच शस्त्रही होते. मात्र, बरे झाले, त्यांना खालीच पैसे मिळाले; अन्यथा माझ्या जीवावर बेतले असते, अशी भीती जिग्नेश शेठ यांच्या बोलण्यातून व्यक्त झाली. चोरीच्या दोन घटनांनी एमआयडीसीतील व्यावसायिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
कॅमेऱ्यात त्रिकूट कैद
दोन्ही कंपन्यांत सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित आहेत. कॅमेऱ्याने तिघा चोरट्यांच्या हालचाली कैद केल्या आहेत. तीन चोरटे कंपनीजवळ येतात. शटरला छेडछाड करत दोघे कंपनीत शिरतात. एक साथीदार कंपनीच्या बाहेर वॉच करीत होता. चेहरा कपड्याने लपविला होता. अंगावर शाल टाकलेली होती आणि हाफ पँट त्यांनी परिधान केली होती.