जळगाव : पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज अर्थात सौर ऊर्जा योजनेंतर्गत ३ किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून अनुदान दिले जात आहे. यात सौर ऊर्जा प्रकल्प बसविणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान लाभ असल्यामुळे गेल्या वर्षभरात अनेकांनी या योजनेचा लाभ घेत वीज बिलातून मुक्ती मिळविली आहे.
जिल्ह्यात सौर कृषी पंप योजनेत जळगाव जिल्हा आघाडीवर असून राज्यात पाचव्या क्रमांकावर ग्राहकांची संख्यादेखील बरीच आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसात विजेची मागणी वाढते, तसेच महावितरणकडून वेळी-अवेळी खंडित होणारा वीजपुरवठा, वारंवार करण्यात येत असलेले भारनियमन यामुळे घराच्या अथवा इमारतीच्या छतावरच हजारो वीज ग्राहकांकडून सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे.
सौर ऊर्जा प्रकल्पासाठी कर्ज
घरगुती वीज ग्राहकांना छतावर सौर ऊर्जानिर्मिती संच बसविता यावा, यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सोय उपलब्ध आहे. तसेच, कर्जाची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे.
७८ हजारांपर्यंत अनुदान
घरे, इमारतींच्या छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीज ग्राहकांना एक किलोवॅटसाठी ३० हजार रुपये दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅट आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये अनुदान दिले जाते.
जळगाव परिमंडळात प्रतिसाद
जळगाव परिमंडळात ऑगस्ट २०२४ पर्यंत २० हजार ४४० प्रस्तावांना तांत्रिक मंजुरी देण्यात आली होती. त्यात जळगाव जिल्ह्यात १४ हजार ३०२, धुळे जिल्ह्यात ३ हजार ८०६, तर नंदुरबार जिल्ह्यात २ हजार ३३२ ग्राहकांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली होती. त्यातून ४ हजार १८५ घरांना सौर ऊर्जेचे छत बसविण्यात आले होते. मार्चअखेरीस ही आकडेवारी मोठ्या प्रमाणावर वाढली. जळगाव परिमंडळात मार्च २०२५ अखेर ४७ हजार ३१२ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच, अजूनही ७ हजारांच्यावर प्रस्ताव ऑनलाइन मंजुरीच्या प्रक्रियेत असल्याचे महावितरण प्रशासनाने म्हटले आहे.
सौर प्रकल्पांतून सुमारे २५ वर्षे मोफत वीज
गृहनिर्माण संस्था, घरसंकुलांसाठी वीजवाहन चार्जिंग स्टेशन व सामाईक उपयोगासाठी ५०० किलोवॅटपर्यंत प्रतिकिलोवॅट १८ हजार रुपये, असे कमाल २० लाखांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. ३०० युनिटपर्यंत मासिक वीजवापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठी ही योजना उपयुक्त आहे. सुमारे २५ वर्षे या सौर प्रकल्पांतून घरातील वापरासाठी मोफत वीज उपलब्ध होणार आहे