---Advertisement---
Jalgaon News : महापालिकेच्या प्रशासक काळात शौचालयाच्या देखभाल, दुरूस्तीत दरमहा सात लाखांचा भ्रष्टाचार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शौचालयाचा मक्ता घेणाऱ्या मे. सान्वी मल्टी सर्विसेसचे अंकुश राठोड यांनी मक्त्यातील कुठल्याही अटी-शर्तीचे पालन केले नसल्याची तक्रार माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, याप्रकरणी आयुक्तांनी कारवाई करावी, अशी मागणीही नाईक यांनी केली आहे.
मनपाचे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जळगांव शहर महानगरपालिकेने जळगांव शहरातील मनपाच्या ५१ तटांवरील एकूण २०४२ सिट्सपैकी वापरात नसलेल्या अनावश्यक व जिर्ण झालेल्या २६ तटावरील ६६१ सिट्स निष्काशित करण्याचा महासभा ठराव क्र. ९८९ १५ फेब्रुवारी २०२३ रोजी पारीत केला आहे. तद्नंतर महानगरपालिकेने ३० ऑक्टोबर २०२३ रोजी अनिल जगन्नाथ परदेशी या मक्तेदाराला मक्ता देऊन शौचालय निष्काशित करण्याचा कार्यादेश दिला.
महानगरपालिकेने शौचालयाची दैनंदिन देखभाल दुरुस्तीसह, पाणी, जंतुनाशके इ. बाबत करण्यासंदर्भातचा कायदिश २७ नोव्हेंबर २०२४ रोजी मे. सान्वी मल्टी सर्विसेसचे अंकुश बालाजी राठोड, राजे शिवाजी नगर, बार्शी रोड लातुर यांना मक्तत्र दिला. या मक्त्याचे अवलोकन केले असता कामाच्या कार्यपध्दतीमध्ये १ ते १२ अटी शर्तीचे पालन केलेले दिसून येत नाही. तसेच त्याच करारनाम्यामध्ये वास्तुची देखभाल दुरुस्ती १ ते ६ अटीशर्तीचे पालन केलेले नाही. तसेच कामगार विषयक अटी व शर्ती मधील मुद्दा क्र. १ ते १४ चे पालन केले नसल्याचे दिसून आलेले आहे. दंडाची तरतुद असतांनाही सहा. आयुक्त व उपायुक्त यांचेकडुन एकही दंडात्मक कार्यवाही केली गेली नसल्याचे दिसून आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरमहा सात लाखांचा गैरव्यवहाराचा आरोप
ही बाब लक्षात घेऊनसुध्दा मनपा प्रशासनाच्या वतीने मे. सान्वी मल्टी सर्विसेसला दरमहा ७ लाख रूपयांपर्यंत देण्यात येत असून यामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केला आहे. तरी आयुक्त तथा प्रशासक यांनी याबाबत योग्य ती कार्यवाही न केल्यास उच्च स्तरावर म्हणजेच न्यायालयात तक्रार दाखल करण्यात येईल.
शहरातील प्रभाग क्र.१५ मधील जुम्मा शहाच्या वखारीजवळील, फुकटपुरा सार्वजनिक शौचालय जवळील महादेव मंदिर सार्वजनिक शौचालय. नेताजी चौक सार्वजनिक शौचालय. पीरुबाबा दर्गा सार्वजनिक शौचालय या ठिकाणांची अवस्था बिकट स्वरुपाची आहे. या ठिकाणी पाण्याची व्यवस्था, लाईट व्यवस्था, दरवाजे तुटलेले, संडासचे भांडे, टाईल्स तुटलेल्या स्वरूपात आहेत. तरी या गंभीर प्रकाराची दखल घेत आयुक्तांनी कारवाई करावी, अन्यथा महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही नाईक यांनी दिला आहे.