जळगाव : जळगाव जिल्ह्यातील गेल्या सप्ताहात रविवार वगळता पाच ते सहा दिवसापासून पाऊस झाला आहे. संततधार पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले असून या नुकसानीचे तातडीने पंचनामे करीत शासनाने आर्थिक मदतीसह ओला दुष्काळ जाहिर करावा अशी मागणी विधान परिषद आमदार एकनाथराव खडसे यांनी केली.
जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असून पावसाचे थैमान सुरू आहे. या संततधार पावसामुळे शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यामुळे मका, सोयाबीन, ज्वारी बाजरीसह कापणी होउन काढणीस आलेली पिके पिवळी पडून सडण्याच्या मार्गावर असून उत्पन्न हातचे गेले आहे. तसेच कापणी करून पडलेल्या मका पिकासह कपाशीची बोंडे देखील गळून पडत आहेत. या साचलेल्या पाण्यामुळे शेतशिवारात तसेच ग्रामीण वसाहत परिसरात रोगराई पसरल्यामुळे अनेक साथीचे आजार उद्भवण्याची शक्यता आहे.
शेतउत्पादन नष्ट होण्याच्यामार्गावर असल्याने पीककर्ज परतफेड होउ शकणार नाही, त्यामुळे यावर कर्जमाफी लागू करीत ओला दुष्काळ जाहिर करीत मदत जाहिर करावी. तसेच काही तालुक्यात पशुधनावर पुन्हा लम्पी साथ आजाराचा प्रादूर्भाव व लागण होत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने लम्पी साथआजार प्रतिबंधात्मक लसीकरण तातडीने करण्याचे नियोजन करावे अशी मागणीही आमदार खडसे यांनी केली.
पर्जन्यमापक यंत्रे नादुरूस्त
जिल्ह्यात अनेक मंडळ परिसरात सरासरीपेक्षा अतीवृष्टी झाली आहे. परंतु बऱ्या ठिकाणी शासनाकडून पर्जन्यमापक यंत्रे बसविण्यात आली आहेत. परंतु पर्जन्यमापक यंत्रे नादुरूस्त असून बंदच असल्याने अतीवृष्टी झाली आहे कि नाही हे मोजलेच जाऊ शकत नाही. त्यामुळे हि यंत्रे दुरूस्त करावीत अशी मागणी केली.