जळगाव : दुचाकीच्या धडकेत गंभीररित्या जखमी झालेले जिल्हा परिषदेचे उपलेखा अधिकारी दिलीप काशिनाथ वानखेडे (वय ५५, रा. खोटेनगर) यांचा सोमवार, ३० रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास उपचार घेत असताना खाजगी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. ही वार्ता कळताच कुटुंबियासह नातेवाईक व स्नेहीजणांना धक्का बसला. अनेक कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली.
सुत्रांच्या माहितीनुसार, दिलीप वानखेडे हे गुरुवार, २६ रोजी दुपारी रस्त्याच्याकडेला पायी चालत होते. त्याचवेळी राँगसाईडने आलेल्या दुचाकीने त्यांना जोराची धडक दिल्याने कोसळुन त्यांच्या डोक्याला जबर इजा झाली. प्रत्यक्षदर्शीनी घटनास्थळी धाव घेत त्यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. त्यानंतर त्यांना अधिकच्या उपचारासाठी शहरातील खाजगी हॉस्पीटलमध्ये हलविण्यात आले होते. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या पाच दिवसापासुन ते उपचाराला प्रतिसाद देत होते. दरम्यान आज दुपारी त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली. त्यांच्याकडून उपचाराला प्रतिसाद न मिळू शकल्याने दोन वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आला.
ही वार्ता कळाल्यानंतर जिल्हा परिषदेतील त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी तसेच शहरातील नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेत हळहळ व्यक्त केली. दिलीप वानखेडे हे मुळ पहूर, ता. जामनेर येथील रहिवासी असुन कुटुंबासह खोटेनगर येथे वास्तव्य करीत होते. ते जिल्हा परिषदेच्या लेखा विभागात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. जिल्हापेठ पोलिसांनी या प्रकरणी पंचनामा नोंदवून पोलीस ठाण्यात नोंद केली.
पुत्र आयएएस उत्तीर्ण, कुटुंबात आनंद
गुरुवारी अपघात होण्याच्या घटनेच्या दोन दिवसापूर्वी दिलीप वानखेडे यांचा मुलगा हा आयएस उत्तीर्ण झाला. त्यामुळे वानखेडे कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मित्र आणि स्नेहींना या आनंदात सामील करण्याचे नियोजन दिलीप वानखेडे यांनी केले होते. मात्र गुरुवारी त्यांचा अपघात झाल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये काळजी निर्माण झाली होती. लवकर ते यातून बरे होतील, असा विश्वास कुटुंबियांसह नातेवाईकांना होता. मात्र मृत्यूशी ते देत असलेली झुंज पाचव्या दिवशी दुपारी संपुष्टात आली आणि त्यांचा मृत्यू झाला.