जळगाव : जिल्ह्यातच नव्हेतर राज्यासह आशिया खंडात सर्वात जास्त ३६ हजाराहून अधिक सभासद संख्या आहे. अशी नावाजलेली जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची पतपेढी अर्थात ग. स. सोसायटी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूक १४ ऑक्टोबर रोजी ग.स. सोसायटी मुख्य इमारत सभागृहात होईल. यासाठी पिठासन अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डी. व्ही. पाटील यांची नियुक्त करण्यात आली असल्याची माहिती सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी दिली.
अध्यक्ष उपाध्यक्ष पदांचा राजीनामा नाट्य ग. स. सोसायटीची सार्वत्रिक निवडणूक मे २०२२ मध्ये पार पडली आहे. यात सहकार गट ९, प्रगती गट ६ तसेच लोकसहकार गट ६ असे २१ संचालक निवडून आले होते. ग.स. सोसायटीवर ‘सहकार गटा’ची सत्ता असून सार्वत्रिक निवडणुकीनंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी दरम्यान रवींद्र पाटील व ज्ञानेश्वर सोनवणे यांनी सहकार गटाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे सहकार गटाचे अध्यक्ष उदय पाटील यांना ग.स. सोसायटीच्या अध्यक्ष पदाची संधी मिळाली तर रवींद्र सोनवणे यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली होती. ठरल्यानुसार दोन वर्षांनंतर अध्यक्ष, उपाध्यक्षपदी दुसऱ्या गटाला संधी देण्याचे वेळी, मात्र उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे यांनी पदाचा राजीनामा देण्यास आढेवेढे घेतले होते. परंतु अखेर दोघांनी राजीनामा दिला होता.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
सहकार विभागाकडून सोमवार, १४ रोजी अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी कार्यक्रम जाहिर झाला आहे. यात सकाळी ११ वा. नामनिर्देशन व स्वीकृती, ११.३० वा. वैध अवैध छाननी, १२ वा. वैध अर्जाची यादी प्रसिद्धी तर दु. १२.३० पर्यंत माघार व त्याचवेळी अंतिम उमेदवारी जाहिर करणे. यानंतर १२.३० ते १ वाजे दरम्यान मतदान, दु.१.३० ते २ मतमोजणी व २ वाजता विजयी उमेदवाराची घोषणा करण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक बलसाणे यांनी म्हटले आहे.
ग.स. सोसायटीत सद्यःस्थितीत सहकार गट १५, प्रगती गट ४ तर लोकसहकार गटाचे २ अशी सदस्य संख्या आहे. यात संचालक सदस्यांना समान संधी देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी अनेक नावे चर्चेत आहेत. असे असले तरी सेवानिवृत्त होणाऱ्यांना संचालक सदस्यांना सर्वप्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. विशेषतः अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी इच्छुक उमेदवारांची नावे घोषित केली जातील व त्यांचे अर्ज भरले जातील. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी दोन्ही विरोधी गटांच्या अध्यक्षांशी चर्चा करण्यात येईल.
– उदय पाटील, अध्यक्ष, सहकार गट