जळगाव : येथील मेहरूण परिसरातील जुने टी.बी. रूग्णालय येथे स्व. बाळासाहेब ठाकरे रूग्णालय सुरू करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनपा आयुक्तांना करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन तालुका संघटक संदीप मांडोळे यांच्या नेतृत्वखाली देण्यात आले.
जुने टी. बी. रुग्णालय, मेहरूण यास लागुनरामेश्वर कॉलनी, अक्सा नगर, संतोषी माता नगर, महाजन नगर, मेहरूण गावठाण मधील नागरीकांमध्ये अंदाजे ६०-७०% म्हणजेच २५ हजार नागरीक राहत आहेत, विशेष म्हणजे हे सर्व नागरीक हे एमआयडीसीतील मजूर वर्ग, कामगार वर्ग तसेच धुणे-भांडी करणारा गरीब वर्ग आहे. त्यांना खासगी रुग्णलयात उपचार घेणे शक्य नाही.
या परीसरातील नागरीकांना किरकोळ आजारपणावरील उपचाराकरीता कोणताही सरकारी दवाखाना जवळपास नाही. या नागरिकांना सोयीस्कर व्हावे याकरिता मेहरूण परिसरातील जुने टी. बी. हॉस्पीटल येथे स्व. बाळासाहेब ठाकरे रूग्णालय १० बेडचे महानगरपालीकेतर्फे त्वरीत चालू करण्यात यावे. जेणेकरून सर्व गरीब, कामगार, मजुर, धुणे-भांडी करणाऱ्यांना मोफत व कमी दरात औषधोपचार होऊन त्यांचे जीवन सुरळीत चालण्यास मदत होईल.
जुने टी.बी. हॉस्पीटल येथे स्व. बाळासाहेब ठाकरे रुग्णालय त्वरीत चालू करावे, अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर तालुका संघटक संदीप मांडोळे, शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष अविनाश पाटील, सचिव हर्षल वाणी, ललित शर्मा, प्रदीप पाटील आदींची स्वाक्षरी आहे.