जळगाव : शासनातर्फे मागील वर्षी सेंट्रलाईज पद्धत वापरुन प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले होते. या पद्धतीवर आक्षेप घेत बराच गोंधळ उडाला होता. यावर्षी महापालिकेच्या मुख्यध्यापकांना मोफत गणेश वाटपाचे अधिकार देण्यात आले आहेत. यात मुख्याध्यापक गणवेशाचा कापड व रंग निश्चित करतील. जळगाव महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या अंतर्गत असणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येणार आहे. यात केवळ महापालिकेच्याच शाळेतील विद्यार्थांना मोफत गणवेश मिळणार असून खासगी शाळेमधील विद्यार्थ्यांच्या पालकांना मात्र स्वतः गणवेश घ्यावे लागणार आहेत.
जळगाव महापालिकेच्या एकूण २६ शाळा आहेत. त्यात मराठी माध्यमांच्या १२ उर्दू माध्यमांच्या १२ तर दोन हिंदी माध्यमांच्या शाळा आहेत. यात एकूण तब्बल ४ हजार ७३२ विद्यार्थी-विद्यार्थीनी शिक्षण घेत आहेत. यात चौबै विद्यालयात सर्वात जास्त १७५ तर हरीविठ्ठल नगरातील शाळेत १७० विद्यार्थी असल्याची माहिती या विभागातर्फे देण्यात आली.
शासनाने मागील वर्षी राज्यस्तरावरून महापालिका शाळेतील मुलांना मोफत गणवेश दिले होते. त्यात मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाले होते. विधानसभेतही गणवेशाच्या कापडावरून वाद झाले होते. तसेच विद्यार्थ्यांना उशीरा गणवेश मिळाले होते. त्यातही अनेक त्रुटी होत्या. यामुळे यावेळी महापालिकेच्या शाळांनाच हे अधिकार देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. यातही प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांना हे अधिकार देण्यात आले आहेत. तेच रंग ठरवून कापड घेवून ३०० रूपये प्रती ड्रेसनुसार देणार आहेत. त्या-त्या शाळेची शाळा व्यवस्थापन समिती अंतर्गत हा निर्णय घेण्यात येणार आहे. या समितीचे अध्यक्ष मुख्याध्यापक असतात.
