जळगाव : येत्या विधानसभा निवडणुकीत 55 वर्षे वयावरील कर्मचाऱ्यांना केंद्राध्यक्ष ऐवजी एक, दोन ,तीन क्रमांकाची कामे द्यावीत यासह विविध मागण्या माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून करण्यात आल्या. यासंदर्भातील निवेदन निवडणूक उपजिल्हाधिकारी अरविंद अंत्रूर्लीकर यांना बुधवार, १६ रोजी देण्यात आले. यावेळी समन्वय समितीच्या सदस्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर विविध अडचणींवर चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील वय वर्षे 55 वर्षे वरील कर्मचाऱ्यांना केंद्राध्यक्ष म्हणून नियुक्ती ऐवजी क्रमांक एक, दोन, तीन क्रमांकाची कामे द्यावीत जेणेकरून वयोमानाचा विचार करता कामातून सूट न देता त्यांच्यावरील कामाचा ताण हलका होण्यास मदत होईल. शिक्षण विभागासोबत इतर शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांनाही निवडणूक कामे देताना केंद्राध्यक्ष म्हणून नियुक्तीचा विचार व्हावा.
दिव्यांग कर्मचारी, गरोदर, स्तनदा माता, लहान पाल्य असलेल्या माता, दुर्धर आजार, व्याधीग्रस्त कर्मचारी अचानक उद्भवलेली कौटुंबिक गंभीर परिस्थिती अशा बाबतीत कामातून सूट देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे
लोकसभा निवडणुकीच्या वेळी बी.एल.ओ.कर्मचाऱ्यांना निवडणूक मानधनाच्या संदर्भात अडचणी आल्या होत्या. त्यात सकारात्मक विचार व्हावा. निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती पत्रासोबतच ईडीसी प्रमाणपत्र मिळावे किंवा पोस्टल बॅलेट पेपर मिळावेत जेणेकरून केवळ तेवढ्या कामासाठी तालुका स्तरावर चकरा मारणे थांबू शकेल व सुटसुटीत प्रक्रिया पार पाडण्यास मदत होईल.
माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून दिलेल्या निवेदनावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन निवडणूक उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर साहेब यांनी दिले. यावेळी माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष नारायण वाघ, समन्वयक तथा भुसावळ माध्य. शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीचे संचालक तुळशीराम सोनवणे, कार्याध्यक्ष गोविंदा व्ही .पाटील, जिल्हा उपाध्यक्ष तथा माध्यमिक शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष गिरीश एस. नेमाडे (भुसावळ), राजाराम धनगर, बोदवड संतोष कचरे समन्वय समिती मार्गदर्शक डॉ. मिलिंद बागुल यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
गरोदर महिला, स्तनदा माता, दुर्धर आजाराने पीडित कर्मचारी यांना निवडणूक कामकाजातून सूट आणि वय वर्ष 55 वरील कर्मचाऱ्यांना केंद्राध्यक्ष कामकाजातून सवलत तसेच बीएलओ कर्मचाऱ्यांना या निवडणूक कामकाजाचे स्वतंत्र मानधनाचा सकारात्मक विचार व्हावा या गोष्टी प्रामुख्याने अपेक्षित आहे.
– तुळशीराम सोनवणे, समन्वयक माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती जळगाव जिल्हा