जळगाव: जिल्हाधिकारी कार्यालयाशी प्रत्यक्ष भेट न घेता नागरिकांना त्यांच्या तक्रारी व अडचणी मांडण्याची संधी मिळावी यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाने एक नवा उपक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील नागरिकांसाठी “ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा” सुरू करण्यात आली आहे. देशातील पहिल्यांदाच अशा प्रकारची सेवा जळगाव जिल्हा प्रशासनाने सुरु केल्याचे मानले जात आहे.
ऑनलाईन तक्रार निवारणासाठी नव्याने सुविधा सुरू
नागरिकांना अनेक वेळा जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागतात. मात्र, तरीही त्यांच्या तक्रारी लवकर निकाली निघतील याची खात्री नसते. वेळ आणि खर्च वाचवण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून या नव्या सुविधेची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
हेही वाचा : Jalgaon News: खुशखबर ! आता थेट समस्यांबाबत नागरिकांना ‘ऑनलाईन’ साधता येईल जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क
या सुविधेअंतर्गत घरबसल्या नागरिक थेट जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागप्रमुखांशी संवाद साधू शकतील. त्यांच्या समस्या मांडू शकतील आणि ऑनलाईन पद्धतीने त्यांचे निराकरण करण्यात येईल. विशेष म्हणजे, परराज्य किंवा परदेशात असलेल्या जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनाही या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
कशी करायची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी नोंदणी?
जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर “Communication of district administration with citizens through web room” ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. jalgaon.gov.in या वेबसाइटवर जाऊन, संबंधित वेळ निवडून व्हिडिओ कॉलसाठी बुकिंग करता येईल. ही सेवा सोमवार ते शुक्रवार दरम्यान उपलब्ध राहील.
हेही वाचा : भारतातलं असंही एक गाव, लग्नानंतर वधू सात दिवस राहते विवस्त्र, जाणून घ्या कुठली आहे ‘ही’ प्रथा
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी वेळ
सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत 11.30 ते 12.30 वाजेपर्यंत (दोन सत्रांत सेवा उपलब्ध)
नागरिकांना होणारे फायदे
वेळ आणि खर्चाची बचत: जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा मारण्याची गरज भासणार नाही.
थेट संवाद: संबंधित अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधता येणार.
परराज्यातील किंवा परदेशातील नागरिकांसाठी उपयोगी: जळगाव जिल्ह्यातील
परदेशस्थ नागरिकांनाही या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
गोपनीयता: तक्रारींची गोपनीयता पूर्णपणे राखली जाणार आहे.
त्वरित निर्णय प्रक्रिया: तक्रारींच्या सोडवणुकीला गती मिळणार.
पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरू केलेली ही सुविधा देशातील पहिली असल्याचे सांगितले जात आहे. पहिल्याच दिवशी या सुविधेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. अनेक नागरिकांनी ऑनलाइन सहभागी होऊन आपल्या समस्या मांडल्या आणि तत्काळ उत्तर मिळवले.
जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, “ही सेवा सुरू करण्यामागचा उद्देश म्हणजे नागरिकांचे प्रशासकीय काम अधिक सोयीस्कर आणि पारदर्शक करणे. यामुळे नागरिकांना प्रशासनाशी थेट संवाद साधण्याची संधी मिळेल, तक्रारी वेळेवर निकाली निघतील आणि भ्रष्टाचारालाही आळा बसेल.”