Jalgaon News: पुलावरुन नदीत उडी घेत तरुणाने केली आत्महत्या, बांभोरीतील घटना

जळगाव  : शहरातील एका तरुणाने शुक्रवारी, रात्रीच्या सुमारास गिरणा नदीवरील बांभोरी पुलावरुन उडी घेत आत्महत्या केली. या तरुणाने आत्महत्या का केली ? याचे कारण अद्याप उघड झाले नाही. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शुभम सतीश चौधरी (वय २३) हा  तरुण शहरातील मेहरूण परिसरात रेणुकानगरात मामाच्या घरी वास्तव्याला होता. त्याने शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास गिरणा नदीवरील बांभोरी पुलाच्या कठड्यावर चढून त्याने नदीत उडी घेतली. याची माहिती प्रत्यक्षदर्शी वाहन चालकांनी हि बाब बांभोरी गावातील ग्रामस्थांना दिली. घटना कळताच ग्रामस्थ व पोहणारे यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

त्यांनी शुभमला नदीतून बाहेर काढले. परंतु, नदीत पाणी सोडण्यात आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.  त्याला मृतावस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. दरम्यान, शुभमच्या आईचे निधन झाले असून वडील मुंबई येथे कामाला आहेत. तो मामाकडे राहून काम धंदा करीत होता. त्याने आत्महत्या कशामुळे केली हे कारण अद्याप समोर आलेले नाही. तपास हेडकॉन्स्टेबल अनिल फेगडे करीत आहे.