जळगाव : विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजत राज्यात राजकीय हलचालिंना वेग आला आहे. सर्वत्र राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना जळगावातही याचा परिणाम होताना दिसत आहे. जळगावातही राजकीय समिकरण बदलण्याची शक्यता आहे. जळगाव शहर व जळगाव ग्रामीण या मतदारसंघांत महाविकास आघाडीतील शरद पवार गट व उद्धव सेनेकडून दावा केला जात आहे. अशात मेरीटचा उमेदवार उभा करण्यासाठी उमेदवारांची अदलाबदलीचा राजकीय डाव आखला जात असून जिल्ह्यीतील एक माजी राज्यमंत्री उबाठाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. चर्चेत असलेले माजी राज्यमंत्री आज सायंकाळपर्यंत उबाठाची मशाल हाती घेण्याच्या तयारीत मुंबईत ठाण मांडून आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच पक्षांकडून मोर्चेबाधणी सुरू आहे.पक्षस्तरावर या हालचाली होत असताना निवडणुकीच्या रिंगणात उतरु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी देखील आपली फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. अशात गेल्या वेळच्या विधानसभा निवडणुकीत जळगाव शहर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे, तर जळगाव ग्रामीण मतदारसंघाची जागा उद्धव ठाकरे गटाकडे होती. त्यामुळे आता महाविकास आघाडीत जागावाटपाचा पेच निर्माण झाला आहे. कारण जळगाव शहर मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आहे. या पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणारे माजी मंत्री गुलाबराव देवकर हे जळगाव ग्रामीणमध्ये सक्रीय असून या मतदार संघातूनच ते निवडणूक लढवणार आहे. मात्र, जागा वाटपाचा पेच त्यांच्यासाठी अडचणीचा ठरणार आहे.
गुलाबराव विरुद्ध गुलाबराव
जळगाव ग्रामीण मतदार संघ शिवसेनेचा (शिंदे गट) बालेकिंल्ला मानला जात आहे. या ठिकाणी शिंदे गटाचे गुलाबराव पाटील हे विद्यमान आमदार आणि मंत्री देखील आहे. या मतदार संघावर गुलाबराव पाटलांचे चांगलेच वर्चस्व आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात तोलामोलाचा उमेदवार शोधणे शिवसेना (उबाठा) गटासमोर मोठे आव्हन आहे. अशा या राजकीय पेचात शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार गट) राजकीय खेळी खेळण्याच्या तयारीत आहे. या खेळीनुसार, गुलाबराव पाटलांचा विजयरथ रोखण्यासाठी त्यांचे पारंपरिक विरोधक माजी मंत्री गुलाबराव देवकरांना जळगाव ग्रामीणच्या निवडणूक रिंगणात उतरवले जाण्याच्या हालचाली सुरु आहेत.आणि त्यासाठी गुलाबराव देवकरांचा शिवसेना उबाठा गटात प्रवेश घडवून आणण्याचे प्रयत्न आहेत.
तर दुसरीकडे जळगाव शहर मतदार संघातील जागा वाटपाचा पेच लक्षात घेता याठिकाणीही राजकीय डाव टाकला जाणार आहे. कारण भाजपचे आमदार सुरेश भोळे यांची हॅटट्रिक रोखण्यासाठी शरद पवार गटाकडे त्या तोडीचा उमेदवार नाही. तर उद्धव सेनेच्या माजी महापौर जयश्री महाजन या आ. सुरेश भोळे यांना टक्कर देऊ शकता. पण, ही जागा राष्ट्रवादी शरद पावर गटाकडे असल्याने महाविकास अघाडीसमोर राजकीय पेच निर्माण झाला आहे. या स्थितीत महाविकास आघाडीच्या शिवसेना उबाठा गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाने जळगाव शहर व जळगाव ग्रामीण या जागांची अदला-बदली किंवा उमेदवारांचा पक्ष बदलण्या खेळी रचली असल्याची राजकीय चर्चा असून त्यानुसार, पवार गटाचे गुलाबराव देवकर आता उबाठात जात हातात मशाल तर जळगाव शहरातून ठाकरे गटाच्या जयश्री महाजन या शरद पवार गटात जाऊन तुतारी फुंकण्याची शक्यता आहे. यात आज रात्रीपर्यंत गुलाबराव देवकर यांचा शिवसेना उबाठा गटात तर शिवसेना उबाठा गटाचे माजी उपमहापौर सुनील महाजन यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेशाची शक्यता आहे.