भुसावळात खडसे–चौधरींचे मनोमिलन, न.पा निवडणूक होणार रंगतदार

---Advertisement---

 

भुसावळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे आणि माजी आमदार संतोष चौधरी यांच्यातील जुन्या मतभेदांना आता पूर्णविराम लागला आहे. दोन्ही नेते एकत्र येऊन आगामी भुसावळ नगरपालिकेची निवडणूक ताकदीने लढवणार असल्याची घोषणा माजी आमदार संतोष चौधरी यांनी आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.

चौधरी म्हणाले, “आमदार खडसे हे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत.आमच्यात कधीही वैयक्तिक वैर वा वाद नव्हता.काही तात्विक मतभेद असतील, पण ते आता पूर्णपणे मिटले आहेत.आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस भुसावळमध्ये पुन्हा एकदा झेंडा फडकवेल, असा मला ठाम विश्वास आहे.”ते पुढे म्हणाले, “बुधवारी दुपारी खडसे यांच्या फार्महाऊसवर आमची सविस्तर चर्चा झाली. पालिकेची रणनिती ठरवून एकजुटीने निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आता नवे उर्जित वातावरण निर्माण झाले आहे.”

तरुणांना प्राधान्य, लेवा–एससी समीकरणावर भर

पालिका निवडणुकीत लेवा आणि एससी समाजाचे प्रतिनिधित्व करणारा तरुण उमेदवार देण्यात येईल, असे चौधरींनी स्पष्ट केले.
“नगरसेवकपदासाठी सुमारे 70 टक्के जागांवर तरुण कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल. नगराध्यक्ष पदासाठीही जनतेच्या मनातील आणि सामाजिक समीकरण जपणारा उमेदवार उभा करू. मात्र उमेदवाराचे नाव योग्य वेळी जाहीर केले जाईल,” असे ते म्हणाले.

‘जनतेची निवडणूक’,भ्रष्टाचारावर हल्लाबोल

पालिका कारभारावर टीका करताना चौधरी म्हणाले, भुसावळकरांना आजही पाण्यासाठी आटापिटा करावा लागत आहे.कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चूनही पाणीपुरवठा सुधारलेला नाही.गेल्या नऊ वर्षांत नगरसेवक आणि ठेकेदारांचा ‘विकास’ कसा झाला, हे आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत.” सध्या पालिकेवर प्रशासक असल्याने अधिकारी कुठल्याही राजकीय दबावाशिवाय काम करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

9 नोव्हेंबरपासून निवडणुकीचा ‘आखाडा’ गाजणार

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 6 आणि 7 नोव्हेंबर रोजी अर्जभरणी प्रक्रिया पार पडणार असून 8 व 9 नोव्हेंबर रोजी अर्जदारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. “9 नोव्हेंबरपासून भुसावळच्या राजकारणाचा आखाडा गाजलेला दिसेल,” असा दावा माजी आमदार चौधरी यांनी केला.या पत्रकार परिषदेस कुणाल जंगले, माजी सभापती सचिन चौधरी, जयेश चौधरी यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---