जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी (६ जून ) जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत मुक्ताईंच्या पालखीच्या स्थान सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ते मुक्ताईनगर येथे आले होते. मात्र, त्यांच्या प्रवासात झालेल्या विलंबामुळे शितल पाटील या किडनीच्या गंभीर आजाराने ग्रस्त महिला रुग्णाला तातडीने मुंबईतील रुग्णालयात पोहोचणे शक्य झाले. त्यांना आपल्या सोबत विमानात सोबत घेत उपमुख्यमंत्र्यांनी मुंबई गाठले होते. दरम्यान, या महिलेच्या शस्त्रकियेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
जळगाव येथून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष विमानामध्ये शितल पाटील यांना सोबत घेत मुंबईकडे प्रस्थान केले होते. या जळगाव ते मुंबई प्रवासादरम्यान त्यांनी या महिलेबाबत चर्चा केली. या चर्चेदरम्यान ना. शिंदे यांनी महिलेवर होत असलेल्या उपचारसंदर्भात चौकशी करीत अधिक माहिती जाणून घेतली. त्यांनी मुंबई येथे पोहचल्यावर या महिलेसाठी विशेष रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली. या महिलेला बॉम्बे रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. यावेळी रात्रभर उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओसडी तसेच स्वीय सहायक डॉक्टरांच्या संपर्कात होते.
परंतु, काही कारणास्तव काल शनिवारी (७ जून ) रोजी शितल यांची शस्त्रक्रिया होऊ शकली नाही. शस्त्रक्रिया न झाल्याने शितल पाटील यांना विशेष गाडीतून अकोला या ठिकाणी रवाना करण्यात आले. दरम्यान, मंगेश चिवटे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोनवरून याबाबतची सविस्तर माहिती दिली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शितल यांच्याशी संवाद साधत त्यांच्या तब्यतीची चौकशी केली. याप्रसंगी शितल ह्या भावुक झाल्या आणि मला तुमच्या रुपात वडील आणि भाऊ मिळाला अशी प्रतिक्रियात्यांनी यावेळी दिली. तसेच मी या रक्षाबंधनला तुमच्याकडे येऊन तुम्हाला राखी बांधणार असल्याचे सांगितले.
